
पुणे : येथील एस.एम. जोशी सभागृहात किसानपुत्र आंदोलनाचे एक दिवसीय अभ्यास शिबीर नुकतेच (दि.८ ऑगस्ट) रविवार रोजी आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन ज्येष्ठ विचारवंत साहित्यिक संजय सोनवणी यांनी केले. शेतकरी स्वातंत्र्याची ज्योत पेटवून शिबिराची सुरुवात करण्यात आली. पुस्तक भेट देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. शिबिरात एकूण सहा सत्र झाली. राज्य सरकारच्या कृषी विधेयकाच्या त्रुटी वर किसानपुत्र आंदोलनाच्या एक दिवसीय अभ्यास शिबिरात चर्चा करण्यात आली.
संजय सोनवणी म्हणाले की. देशाच्या विकासातील सीलींग, आवश्यक वस्तू, जमीन अधिग्रहण हे कायदे अडथळे आहेत. आपल्या देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन पर्यंत जाऊ शकते. सरकारने शेतकरी विरोधी कायदे रद्द करायला हवेत. देशाची अर्थव्यवस्था बळकट करायची असेल शेती क्षेत्र खुलं करावे लागेल. तंत्रज्ञान विकसित होत असतांना आर्टिफिशेंल इंटिलेजन्स चा शिरकाव देखील या क्षेत्रात झपाट्याने होईल. त्यावेळी आज जे अल्पभूधारक शेतकरी कसे टिकाव धरतील ? हा प्रश्न असेल. भविष्यात ग्रामीण भागात ‘एक गाव एक कंपनी’ ही संकल्पना उभी राहिली पाहिजे. असे अनेक शेतकरी स्वातंत्र्या बाबत मुद्दे त्यांनी मांडले.
किसानपुत्र आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब आपल्या मनोगतात म्हणाले की, राज्य सरकारने केंद्राच्या कायद्यात किरकोळ दुरुस्त्या केल्या आहेत. वास्तविक पाहता, २००६ साली महाराष्ट्राने अगोदरच कायदे केले आहेत. नव्या कृषी विधेयकातील हमी भावासाठी दोन वर्षांच्या कराराला सूट, शेतमाल खरेदी करण्यासाठी परवाना आणि फसवणुकीला ३ वर्षांची शिक्षा या मुद्द्यांवर प्रकाश टाकला. केंद्र व राज्याच्या कायद्यांचा आढावा घेऊन अमर हबीब यांनी शेतकऱ्यांना गळफास ठरणारे शेतकरीविरोधी नरभक्षी कायदे समूळ उखडून फेकून द्यावेत.
प्रथम सत्रात मयुर बागुल यांनी ‘शेतकर्याचे मरण त्याला कायदेच कारण’ हा विषय मांडला. दुसऱ्या सत्रात अमीत सिंग यांनी ‘शेतकरी विरोधी नरभक्षी कायदे’ यावर मार्गदर्शन केले. तिसऱ्या सत्रात अॅडव्होकेट महेश गजेंद्रगडकर यांनी ‘शेतकरी विरोधी घटनादुरुस्त्या’ यावर मार्गदर्शन केले. चौथ्या सत्रात किसानपुत्र आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब यांनी ‘तात्कालीन प्रश्न आणि किसानपुत्र आंदोलनाची भूमिका’ हा विषय मांडला. पाचव्या सत्रात विश्वास सूर्यवंशी यांनी खुल्या चर्चासत्राचे संचालन केले. त्यात न्यायालयीन लढाईची योजना तयार करण्यात आली. ही जबाबदारी अॅडव्होकेट महेश गजेंद्र गडकर, अमित सिंग व असलम सय्यद यांनी स्वीकारली. तर अमर हबीब, अनंत देशपांडे व राजीव बसरगेकर यांच्यावर राज्य सरकारला पाठवायचे निवेदन तयार करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यानंतर शेवटच्या सत्रात समारोप करण्यात आला. कार्यक्रमात व्यंगचित्रकार विश्वास सूर्यवंशी यांच्या व्यंगचित्रांच्या ऑनलाईन पुस्तिकेचे प्रकाशन संजय सोनवणी यांच्या हस्ते करण्यात आले. याचिका भरून घेण्यात कार्तिक चव्हाण यांनी पुढाकार घेतल्याबद्दल यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला. राज्यसभा सभापतींना पाठवायच्या याचिका अमर हबीब यांना देण्यात आल्या. शिबिरास एकूण तीस शिबिरार्थी सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन राठोड यांनी केले.
