टास्क फोर्सच्या बैठकीनंतर १७ ऑगस्ट पासून शाळा सुरु करण्याच्या निर्णयावर ठाकरे सरकारचा सावध पवित्रा

शाळा सुरु करण्याच्या निर्णयाला स्थगिती; नव्या शासन आदेशाची वाट पाहावी लागणार

मुंबई : शालेय शिक्षण विभागाने १७ ऑगस्टपासून शाळा सुरु करण्याच्या काढलेल्या जीआरला सरकारने सावध पवित्रा घेत स्थगिती दिली आहे. टास्क फोर्सच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला असून शाळा सुरु होण्यासाठी आता नव्या शासन आदेशाची वाट पाहावी लागणार आहे.

शालेय शिक्षण विभागानं कोरोना संसर्ग कमी झालेल्या ग्रामीण भागातील ५ वी ते ७ वी आणि शहरी भागातील ८ वी ते १२ वीचे वर्ग दि.१७ ऑगस्टपासून सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाकडून दि.१० ऑगस्टला त्या संदर्भातील शासन निर्णय काढण्यात आला होता. यात मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे शहरातील कोविड परिस्थिती विचारात घेवून शाळा सुरू करणेबाबत निर्णय घेण्यासाठी संबंधित महानगरपालिका आयुक्त यांना प्राधिकृत करण्यात येत आहे. तसेच दि.२ ऑगस्ट २०२१ रोजीच्या ‘ब्रेक द चेन’ मधील सुधारीत मार्गदर्शक सूचनानुसार कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, अहमदनगर, बीड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर जिल्ह्यातील कोविड परिस्थिती विचारात घेवून व अन्य जिल्ह्यांबाबत देखील शाळा सुरू करणेबाबत निर्णय घेण्यासाठी संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना प्राधिकृत करण्यात येत आहे, असे शालेय शिक्षण विभागाने म्हटले होते.

राज्यभरातील त्या त्या भागातील प्रशासन शाळा-कॉलेज उघडण्याबाबत निर्णय घेतील असे शाळा आणि कॉलेज संदर्भात नोटीफिकेशनमध्ये स्पष्ट करण्यात आले होते. टास्क फोर्स आणि पिडीयाट्रीक टास्क फोर्स तसेच पहिल्या कोरोनाच्या लाटेपासून असलेला टास्क फोर्स सर्वांनीच शाळा-कॉलेज सुरु करण्यास विरोध दर्शविला आहे. बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत काही मंत्र्यांनी निर्णयाचा फेरविचार करण्याची गरज व्यक्त केली होती. या बैठकीनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी संवाद साधून शाळा सुरु करण्याबाबत टास्क फोर्सच्या सूचनानंतर निर्णय घेण्यात येईल, असे म्हटले होते. याच अनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टास्क फोर्स आणि शिक्षण विभागाचे अधिकारी यांच्यासोबत बैठक घेण्याचा निर्णय घेतला. दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचं अद्याप लसीकरण झालेलं नाही. इतर राज्यात घडलेले असे प्रसंग पाहता रिस्क घेऊ नये, अशी भिती टास्क फोर्सने व्यक्त केली. त्यावर विचार विनिमय होऊन शाळा सुरु करण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!