पुरोगामी विचारांचा वारसा असणारे प्रा.अशोक पवार

प्रा.अशोक पवार यांचा जन्मदिवस. वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्य कर्तृत्वावर श्री बन्सीलाल भागवत यांनी लिहलेला लेख.

अमळनेर च्या पावनभूमीत दि. ४ सप्टेंबर १९५५ रोजी प्रा.अशोक पवार यांचा जन्म झाला. नगर परिषदेच्या शाळा क्रमांक ३ मधून प्राथमिक, प्रताप हायस्कूल मधून माध्यमिक व प्रताप महाविद्यालयातून त्यांनी पदवी प्राप्त केली. पुणे विद्यापीठातून (हल्लीचे सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे) पदव्युत्तर शिक्षण झाले. पुढे डी.एच.इ. पूर्ण करून सन १९७९ साली प्रताप महाविद्यालयाच्या ज्युनियर विभागात संरक्षण शास्त्राचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. घरातूनच समता विचारांची बांधिलकी असल्याने ते पुरोगामी विचारांचा वारसा असणाऱ्या ‘सेवादल’ संघटनेकडे झुकले. राष्ट्र सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष तसेच राज्य कार्यकारिणीत अनेक वर्ष कार्यरत होते. त्यांचा १९८३ साली ‘छात्रभारती’ या विद्यार्थी संघटनेच्या निर्मितीत प्रमुख सहभाग होता. छात्र भारती स्थापना संमेलनाचे ते स्वागताध्यक्ष होते. नूतन मराठा कॉलेज, जळगाव येथे छात्रभारती ची स्थापना केली. त्यानंतर सन १९९१ मध्ये छात्रभारती चे राज्य अध्यक्ष होते. नव्वद च्या दशकात भारतातील समाजवादी संघटनांचे प्रतिनिधी बनून स्वीडन येथील कोपनहेगन येथे सोशालिस्ट मुमेंट च्या आंतरराष्ट्रीय परिषदेला उपस्थित राहून त्यांनी भारतातील युवकांचे आंतर राष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधित्व केले आहे. अमळनेर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे. सन १९९५ साली जळगाव जिल्हा कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेचे दहा वर्ष जिल्हाध्यक्ष होते. सन १९९८ मध्ये महाराष्ट्र राज्य अध्यक्ष झाले. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यावर अमळनेर चे पहिले तालुकाध्यक्ष होते. अमळनेरच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढविली पण दुर्दैवाने फार थोड्या मतांनी त्यांचा विजय हुकला. साने गुरुजींच्या धडपडणाऱ्या मुलांपैकी एक लढवय्या ध्येयवादी चळवळीत झोकून देणाऱ्या व्यक्तिमत्वाला संधी मिळाली नाही. सन २००४ ची विधानसभेची निवडणूक देखील त्यांनी लढविली.

पंजाब राज्यात अस्थिरता असताना आणि अतिरेकी कारवाया चालू असताना यदुनाथ थत्ते यांच्या नेतृत्वात शांती यात्रेत सहभाग घेतला. उपसा जलसिंचन योजना कर्जबाजारी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी शेतकऱ्यांना सोबत घेऊन प्रदीर्घ आंदोलन केले. त्यात यश मिळाले, सातबारा कोरा झाला. प्रताप मिल कामगारांसाठीच्या लढ्यात सहभाग घेत कामगारांना एक रकमी व्हीआरएस मिळवून दिला. मंडल आयोगाच्या ओबीसींना आरक्षण मिळवण्यासाठी जिल्हाभर जागरण केले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून जळगाव, धुळे या जिल्ह्यात पंचवीस युवकांना सोबत घेऊन सहाशे पाच किलोमीटर सायकल यात्रा काढली. शाहू, फुले, आंबेडकरांचा वारसा चालवताना त्या विचाराच्या माध्यमातून अनेक छोट्या-मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन केले. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ मागणीसाठी लढा उभारतांना महत्वाची भूमिका घेतली. विद्यापीठ पातळीवर परीक्षेतील कॉपी विरोधी आंदोलनावेळी भूमिका घेत विद्यापीठाच्या जडणघडणीत त्यांनी मोठं काम केले आहे.
पुणे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अभ्यास मंडळावर संरक्षण शास्त्र विषयासाठी पुस्तके लिहून बोर्डाला अनेक वर्षे मार्गदर्शन केले. गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे म्हणून प्राथमिक शाळा काढली. यशदाचे राज्यस्तरावर ट्रेनर म्हणून काम करतात. स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत अभ्यासिका व पुस्तके उपलब्ध करून दिले आहेत. आतापर्यंत १३ विद्यार्थी अधिकारी झालेत. युवा कल्याण प्रतिष्ठान व नागरी हित दक्षता समिती च्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात तसेच गरजू व गरीब लोकांसाठी सतत कार्य करीत राहतात. कणखर नेतृत्वाचे धनी असलेल्या प्रा.अशोक पवार शतायुषी होवोत आणि त्यांच्यापासून सहस्रावधींना प्रेरणा मिळो, याच सदिच्छा. दिव्यचक्र परिवारातर्फे जन्मदिनाच्या शुभेच्छा !

बन्सीलाल भागवत, निवृत्त केंद्र प्रमुख अमळनेर
सरचिटणीस : नागरी हित दक्षता समिती.
सदस्य : मौर्य क्रांती संघ,महाराष्ट्र राज्य

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!