शोषितांनी शोषकाविरुद्ध लढा सुरूच ठेवला पाहिजे : सेवानिवृत्त अप्पर जिल्हाधिकारी एच.टी.माळी

अमळनेर : शोषक तर शोषण करत राहणार आहे कारण त्यात त्याचा फायदाच आहे. मात्र.. शोषितांनी शोषकाविरुद्ध लढा सुरूच ठेवला पाहिजे असे मत सेवानिवृत्त अप्पर जिल्हाधिकारी एच.टी.माळी यांनी व्यक्त केले. युवा कल्याण प्रतिष्ठान संचलित राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियान अंतर्गत झालेल्या निबंध स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ नुकताच (दि.१) रोजी अमळनेर येथील जी.एस.हायस्कूलच्या सभागृहात पार पडला. त्यावेळी ते कार्यक्रमाच्या अध्यक्षीय स्थानावरुन बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून प्रा.डॉ.वंदना पाटील, श्रीमती भारती पाटील उपस्थित होत्या.

स्त्री म्हणजे पुरुषाला करून घालणारी सेविका नाही व पुरुष स्त्रीला पोसणारा तारणहार नाही हे ज्या दिवशी स्त्री पुरुष दोघांना उमगेल त्या दिवशी स्त्री पुरुष समतेची पहाट आली असे म्हणता येईल. स्त्री निसर्गतः अबला नसते तर ती घडवली जाते असे मत डॉ. प्रा. वंदना पाटील (कौठळकर) यांनी व्यक्त केले. आधार संस्थेच्या डॉ.भारती पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, लिंग भेदाच्या पलीकडे जाऊन प्रत्येक व्यक्तीचे माणूस पण फुलायचे असेल तर माणसानेच तयार केलेल्या लिंग निष्ठ चौकटी, श्रेष्ठ-कनिष्ठतेच्या श्रेणी नेस्तनाबूत करणे गरजेचे आहे. वैयक्तिक सुखापेक्षा महिलांनी व्यक्तिगत स्वातंत्र्याला अधिक महत्त्व दिले पाहिजे.

‘महिला सक्षमीकरण पुरुष मानसिकतेची भूमिका’ व ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले’ या दोन विषयावर १५ ते ३० या वयोगटातील युवा वर्गासाठी निबंध स्पर्धा आयोजित केलेली होती. यात ३६ मुलींसह एकूण ४२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या निबंध स्पर्धेत केतकी पुरुषोत्तम सोनवणे प्रथम, मयुरी मधुकर भोई द्वितीय तर कोमल शैलेश झाबक तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले. कविता सुरेश पाटील, ऐश्वर्या संजय सोमवंशी, कल्याणी हेमंत महाजन, ऋतुजा संभाजी पाटील, वैष्णवी मच्छिंद्रनाथ पाटील उत्तेजनार्थ बक्षिसाचे मानकरी ठरले. मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीसाचे वितरण करण्यात आले. निलेश शिवाजी पाटील यांना विशेष पुरस्कार देण्यात आला. या बक्षीसांचे प्रायोजक आशिष पवार, अनिता सिसोदेे, शिरसाठ सर, योगेश पाटील यांनी स्विकारले होते.

युवा कल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.अशोक पवार यांनी प्रास्ताविक केले. पाच वर्षात १००० राष्ट्रीय स्त्री- पुरुषांवर अभ्यासपूर्ण सादरीकरण करणारे वक्ते तयार करणार असा मानस यावेळी व्यक्त केला. कार्यक्रमात सौ.तिलोत्तमा रवींद्र पाटील, संदीप घोरपडे, भूषण भदाणे, सुनील शिंपी, श्रीनाथ पाटील, सनी गायकवाड, अनिरुद्ध शिसोदे, सारांश सोनार, योगेश घोडके यांचा विशेष कार्याबद्दल सत्कार करण्यात आला. जी.एस.हायस्कूल चे माजी मुख्याध्यापक स. सु. बोरसे यांनी आपल्या मनोगताने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बन्सीलाल भागवत यांनी तर आभार प्रदर्शन वाल्मिक मराठे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी एस.एम.पाटील, छाया सोनवणे, पवार आप्पा, विठ्ठल पाटील, डी.एम.पाटील, डॉ.राहुल निकम, संदीप जैन, राजू पाटील, यतीन पवार, बाळू बिऱ्हाडे आदींनी परिश्रम घेतले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!