पात्र लाभार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन
जळगाव : जिल्ह्यात १ ते ७ सप्टेंबर २०२१ या कालावधीमध्ये प्रधानमंत्री मातृ वंदना सप्ताह राबविण्यात येत आहे. या सप्ताहामध्ये प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र व सर्व आरोग्य सेवा कार्यक्षेत्रामध्ये जास्तीत पात्र लाभार्थीना लाभ देण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील पात्र लाभार्थीनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ पंकज आशिया, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.भिमाशंकर जमादार यांनी एका संयुक्त प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
भारतातील दारिद्र्य रेषेखालील व दारिद्र्य रेषेवरील अनेक गर्भवती महिलांना गरोदरपणाच्या शेवटच्या टप्यापर्यंत मजुरीसाठी काम करावे लागते. यामुळे अशा गर्भवती महिला व माता कुपोषित राहून त्यांचे व त्यांच्या नवजात बालकाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. माता व बालकांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने गर्भवती माता व स्तनदा मातेला सकस आहार घेण्यास प्रोत्साहित करुन त्यांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी व जन्माला येणाऱ्या नवजात बालकाचेही आरोग्य सुधारावे आणि मातामृत्यु व बालमृत्यु दरात घट होऊन तो नियंत्रित राहावा. यासाठी केंद्र शासनाच्या महिला व बालविकास मंत्रालयाने प्रधानमंत्री मातृ वंदना योजना संपूर्ण देशात १ जानेवारी २०१७ पासून कार्यान्वित केलेली आहे. राज्यातील प्रथमत: गर्भवती महिला व स्तनदा माता ज्यांची गर्भधारणा १ जानेवारी २०१७ रोजी अथवा तद्नंतर झाली असेल अशाच पात्र महिलांना प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा लाभ पहिल्या जिवीत अपत्यासाठी दिला जात आहे. मात्र, ज्या गरोदर व स्तनदा माता या केंद्र अथवा राज्य सरकारच्या कर्मचारी आहेत किंवा सार्वजनिक उपक्रमात कार्यरत आहेत. अशा मातांना लाभ अनुज्ञेय नाही. गरोदर व स्तनदा या अंगणवाडी कार्यकर्ती किंवा अंगणवाडी मदतनीस किंवा आशा या योजनेच्या निकषात बसत असतील तर त्यांना हा लाभ देता येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यास मान्यताप्राप्त आरोग्य निदान योजनेतर्गत नोंदणी करणे आवश्यक आहे.
या योजनेंतर्गत ३ टप्प्यांमध्ये पाच हजारांचे अनुदान आधार संलग्न बॅक खात्यात किंवा पोस्ट ऑफिसमधील खात्यात DBT व्दारे दिले जाते. पहिला हप्ता १ हजार रुपये मासिक पाळीच्या शेवटच्या तारखेपासून १०० दिवसात गर्भधारणा नोंदणी केल्यानंतर प्राप्त होईल. दुसरा हप्ता २ हजार रुपये किमान एकदा प्रसवपुर्व तपासणी (ANC) केल्यास गर्भधारणेचे सहा महिने तथा १८० दिवस पुर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा केला जाईल. तिसरा हप्ता २ हजार रुपये प्रसूतीनंतर झालेल्या अपत्याची जन्मनोंदणी व बालकास बीसीजी, ओपीव्ही, डीपीटी आणि हिपॅटॅटीस बी व त्या अनुषंगिक लसीकरणाचा पहिला खुराक दिल्यानंतर लाभार्थीच्या बँक खात्यात जमा केला जातो. तरी जिल्ह्यातील पात्र लाभार्थीनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.