चाळीसगाव : तालुक्यात झालेल्या जोरदार पाऊसामुळे छोटे-मोठे बंधारे, पाझर तलाव व इतर छोट्या-मोठ्या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गिरणा नदी, उपनद्या व नाल्यांना मोठा पूर आलेला आहे. चाळीसगाव शहरातून जाणाऱ्या डोंगरी व तितुर नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने चाळीसगाव शहराला पाण्याचा वेढा पडला आहे. मध्यरात्रीनंतर पावसाचा कहर झाल्याने मोठी आर्थिक हानी झालेली आहे. अनेक नागरीक झोपेतच होते. यामुळे अद्यापपर्यंत नुकसानीचा अंदाज आलेला नाही. नदी पात्र उथळ झाल्याने शहरात पाणी शिरले असावे असे बोलले जात आहे.
चाळीसगाव तालुक्यातील मुंदखेड़ा, वाकळी, रोकड़े, पानगांव, बोरखेड़ी या गावांनाही पुराचा वेढा आहे. वाकळी गावातून दोन ट्रॅक्टर व मुंदखेडा शिवारातून सुमारे दोनशे गुरे वाहून गेल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. जामदा बंधाऱ्यावरून १५०० क्यूसेक पाणी जात असल्याने पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. पुराचे पाणी गिरणा नदीत येऊन मिळत असल्याने गिरणा नदी काठावरील रहिवाशांनी सावधानता बाळगावी. ग्रामपंचायत, स्थानिक स्वराज्य संस्था, पंचायत समिती व महसूल प्रशासनाने योग्य ती काळजी घेऊन सर्वांना अवगत करावे असे गिरणा पाटबंधारे उपविभाग चाळीसगाव यांनी कळविले आहे.