लकी ड्रॉ च्या भाग्यवान विजेत्या भगिनींना ज्ञानदेव मुक्ताई ग्रुप कडून ‘माहेरची साडी’ तर अन्य स्पर्धकांना पारस गोल्ड व पद्मालय पोहे, अमळनेर यांचेकडून स्नेहभेट व स्मृतिचिन्ह
मारवड : येथील ज्ञानदेव – मुक्ताई ग्रुप आयोजित ‘वाट माहेरची’ हा मारवड आणि मारवड च्या भूमीत शिकलेल्या सर्व माहेरवाशीण लेकींचा ‘माझं माहेर मारवड ‘ हा स्नेहमेळावा ज्ञानदेव -मुक्ताई ग्रुप मारवड यांच्यातर्फे सोमवार, दि. ४ नोव्हेंबर रोजी सु. हि. मुंदडे हायस्कुलच्या प्रांगणात उत्साहात संपन्न झाला. स्नेहमेळाव्यात सर्व वयोगटातील भगिनींची उपस्थिती होती. गाव दरवाजा वरील गणेश पूजनाने रॅलीला सुरुवात झाली. रॅलीत माँसाहेब जिजाऊ, झाशीची राणी, सावित्रीमाई यांसारख्या कर्तबगार महिलांची वेशभूषा साकारण्यात आली होती. कन्या शाळेच्या मुलींनी लेझीम पथकाच्या तालात आपला सहभाग नोंदविला. ठिकठिकाणी आकर्षक रांगोळ्या साकारल्या होत्या. माँसाहेब जिजाऊ व सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन व दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी दिवंगत माहेरवाशिणींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
कार्यक्रमात मुख्याध्यापिका सौ. अनिता बोरसे, सौ. रुपाली पाटील यांच्या माहेरच्या कथा मनात घर करून गेल्या. सौ.अश्विनी चौधरी, सौ. वृषाली पाटील यांचे कथ्थक नृत्य, व सौ.योगिता पांडे व वृक्षवल्ली गृप यांच्या रास नृत्याने रंगत आणली. करोडपती फेम शरद धनगर यांच्या अहिराणी भाषेतील माय माहेरच्या ओव्या, आणि कवितेने उपस्थित महिला भगिनी भावविभोर झाल्या. उपस्थित भगिनिंनी सौ. अपेक्षा पवार व सौ. शुभांगी खंडाळे यांच्या गीतांवर मनमुराद नृत्याचा आनंद लुटला. कार्यक्रमाच्या निमित्ताने मारवडच्या माय -माहेरातील भुतकाळाच्या स्मृती, बालपण, शालेय जीवन आणि गावच्या आठवणींना उजाळा मिळाला. सर्व वयोगटाच्या अनेक सखींना अनेक वर्षानंतर माहेरात भेटण्याचा दुर्मिळ योग यानिमित्त जुळून आला. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असलेल्या लकी ड्रॉ च्या भाग्यवान विजेत्या भगिनींना ज्ञानदेव मुक्ताई ग्रुप कडून ‘माहेरची साडी’ स्नेहभेट म्हणून ‘देण्यात आली. यावेळी माहेरवाशिणींनी विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम सादर केले. यात सहभागी सर्व स्पर्धकांना पारस गोल्ड व पद्मालय पोहे अमळनेर यांचेकडून स्नेहभेट व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ.नलिनी मुंदडा यांनी केले. सुत्रसंचालन सौ. रेखा मराठे व सौ. वर्षा पाटील यांनी तर आभार प्रदर्शन सौ. करुणा पाटील व रजनी गुरव यांनी केले. कार्यकम यशस्वीतेसाठी ‘ज्ञानदेव- मुक्ताई ‘ ग्रुपचे गोकुळ पाटील, सुभाष पाटील, महेश साळुंखे, प्रदीप चौधरी, विनय साळुंखे, दिपक पाटील, सचिन साळुंखे, देवेंद्र साळुंखे, राकेश गुरव, प्रदीप निकम, उमेश सुर्वे, शरद पाटील, सुजित साळुंखे यांनी सहकार्य केले. वंदे मातरम गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.