हतनूर धरणातील पाणी पातळी वाढल्याने पाण्याचा विसर्ग तापी नदीपात्रात सोडावा लागणार

तापी नदी काठावरील गावातील नागरीकांनी सावधानता बाळगण्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे आवाहन

जळगाव : हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रावरील भागात पाऊस सुरु असून पूर्णा नदीलाही पूर येत आहे. धरणात पाण्याची आवक वाढून धरणातील पाणी पातळी सतत वाढत आहे. पूर्णा नदीचे पुराचे पाणी सायंकाळपर्यंत हतनूर धरणात पोहोचण्याची शक्यता असल्याने धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग तापी नदीपात्रात सोडावा लागणार असल्याचे जळगाव पाटबंधारे विभागाने प्रशासनास कळविले आहे. यामुळे तापी नदी काठावरील गावातील नागरीकांनी सावधानता बाळगण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

सध्या हतनूर धरणाचे ४ दरवाजे पूर्ण तर २ दरवाजे दोन मीटरने उघडण्यात आले असून यातून २७ हजार ८२८ क्युसेक तर कालव्यातून १०० क्युसेक पाण्याचा विसर्ग तापी नदीपात्रात सुरु आहे. तरी तापी नदीकाठावरील गावातील सर्व नागरिकांनी सावध रहावे. नदी काठावरील गावातील लोकांनी तापी नदी पात्रांमध्ये जावू नये, आपली गुरे-ढोरे नदीच्या पाण्यात जाणार नाहीत. तसेच नदीपात्रालगतची आपली शेती उपयोगी साहित्य, सामुग्री, पशुधन सुरक्षितस्थळी राहील याची दक्षता घ्यावी. जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी सर्वांनी सतर्क राहून आपली काळजी घ्यावी. कुठलीही आपत्तीजन्य परिस्थिती लक्षात आल्यास त्वरीत प्रशासनास सूचित करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राऊत यांनी केले आहे.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!