
अमळनेेर : महाराष्ट्र शासनाने ई – पीक पाहणी अॅप कार्यान्वित केले असून प्रत्येक शेतकर्याने त्यांच्या पिकाची नोंदणी सदर अॅपद्वारे दि.१५ सप्टेंबर २०२१ पर्यंत करावी, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. ही निश्र्चितच चांगली गोष्ट आहे. तथापि, ग्रामीण भागांतील शेतकर्यांना ई –पीक नोंदणी करण्यात अनेक अडचणी निर्माण होत असून ऑनलाइन मोहिमेचा फज्जा उडाल्याचे चित्र आहे.
साधारणतः ७५% शेतकर्यांकडे अँड्राईड मोबाईल नाही. विकत घ्यायला पैसे नसल्याने ते मोबाईल खरेदी कसे करणार ? अगदी मोबाईल घेतलाच तर तो वापरायचा कसा ? याचे अनेकांना ज्ञान नाही. ग्रामीण भागात रेंज मिळत नाही. रेंज मिळालीच तर सर्व्हर कनेक्ट होत नाही. तर मग ई-पीक नोंदणी कशी करावी ? असा प्रश्न असंख्य शेतकर्यांपुढे निर्माण झाला आहे. ई-पीक पाहणी अॅपद्वारे पिकाची नोंदणी करताना अनेक अडचणी येत आहेत. पिकाची माहिती कशी भरावी ? हे अनेक शेतकर्यांना माहित नाही. सामान्य शेतकर्यांना ई-पीक पाहणी माहिती भरणे शक्य होत नाही. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी पिकाची नोंदणी केलेली नाही अशा शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी तलाठ्यांमार्फत करून माहिती भरण्यात यावी, अशी मागणी शेतकर्यांकडून होत आहे.
