महसूल विभागाच्या सर्व तलाठी, कृषी सहाय्यक, शेतकरी यांना सूचना
अमळनेेर : शेतकर्यांना ई –पीक नोंदणी करण्यात येत असलेल्या अडचणी लक्षात घेऊन राज्यस्तरीय अंमलबजावणी समितीच्या दि ८.९.२०२१ च्या बैठकीत शेतकरी यांनी खरीप हंगाम ची पिक पाहणी करण्यासाठी असलेली १५ सप्टेंबर ही मुदत ३० सप्टेंबर पर्यंत वाढविण्यास मान्यता दिली आहे. त्यानंतर १५ ऑक्टोबर पर्यंत तलाठी स्तरावरुन पीक पाहणी करण्यास देखील मान्यता दिली असल्याचे ई पीक पाहणी प्रकल्प, पुणेचे राज्य समन्वयक रामदास जगताप यांनी कळविले आहे.
महाराष्ट्र शासनाने ई – पीक पाहणी अॅप कार्यान्वित केले असून प्रत्येक शेतकर्याने त्यांच्या पिकाची नोंदणी सदर अॅपद्वारे दि.१५ सप्टेंबर २०२१ पर्यंत करावी, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले होते. तथापि, शेतकर्यांना ई –पीक नोंदणी करण्यात येत असलेल्या अडचणी लक्षात घेऊन पिकाची नोंदणी करावयाच्या मुदतीत ३० सप्टेंबर पर्यंत वाढ करण्यात आली आहे. यासंदर्भात महसूल विभागाच्या सर्व तलाठी, कृषी सहाय्यक, शेतकरी यांना तशा सूचना देण्यात आल्या आहेत. मुदत वाढवली असली तरी दररोजचा पाऊस, अनेकांना मोबाईल हाताळण्याचे ज्ञान नाही, ग्रामीण भागात मोबाईल ला नसलेली रेंज, रेंज मिळालीच तर सर्व्हर कनेक्ट न होणे अशा अनेक अडचणी कशा सुटतील ? हेदेखील महत्त्वाचे आहे.