सार्वजनिक बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देणार का ?
अमळनेर : तालुक्यातील खवशी येथे गेल्या तीन महिन्यांपूर्वी लाखो रूपये खर्चून तयार केलेल्या खवशी ते नांद्री या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याची तक्रार सार्वजनिक बांधकाम विभागाकडे करण्यात आली होती. मात्र त्यावेळी तक्रारीची दखल घेण्यात आलेली नाही. नुकत्याच झालेल्या पावसामुळे रस्त्याचे काम अधिकच निकृष्ट असल्याचे उघड झाले आहे. यावर्षी नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीनंतर लगेचच सुरु होणारे हे पहिले विकास काम. अनेक दिवसांपासून खवशी ते नांद्री रस्त्याचे हे रेंगाळलेले काम सुरु झाल्याने ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला. सर्व नवनिर्वाचित सदस्यांचे कौतुक केले. पण त्या कौतुकाला काहीसे गालबोट लागले आहे.
माजी आमदार स्मिताताई वाघ, जि.प.सदस्या मीनाताई पाटील यांच्या उपस्थितीत खवशी ते नांद्री रस्त्याच्या डांबरीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला होता. लाखो रूपये खर्च करुन तीन महिन्यांपूर्वी खवशी ते नांद्री रस्त्याचे काम करण्यात आले आहे. नांद्रीकडून खवशीकडे येणाऱ्या अर्धा कि.मी. रस्त्याचे काम अजूनही झालेले नाही. रस्त्यात असंख्य खड्डे आहेत. रस्त्याचे जे काम पूर्ण झाले ते निकृष्ट दर्जाचे आहे. सध्या सुरु असलेल्या पाऊसाने तर रस्त्याची दुर्दशा केली आहे. रस्त्याचे डांबरीकरण निघून सर्वत्र खड्डे झाले आहेत. खड्ड्यात पाऊसाचे पाणी साचत असल्याने वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. इस्टीमेट नुसार काम झाले नाही, व्यवस्थित पणे रस्त्याचे लेव्हलींग केले गेलेले नाही, रस्त्याशेजारील साईडपट्ट्यांचे काम सुद्धा व्यवस्थित झालेले नाही, याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार करून सुद्धा तक्रारदाराला विश्वासात घेतलेले नाही अशी ग्रामस्थांची तक्रार आहे. संबंधित ठेकेदार व ज्या अभियंत्याने रस्त्याचे काम तपासून रस्ता उत्कृष्ट असल्याचा अहवाल दिला असेल अशांची शासनाने चौकशी करावी ? संबंधित ठेकेदाराचे नाव काळ्या यादीत समाविष्ट करावे, बिल अदा केले असेल तर पैसा न पैसा त्या ठेकेदारा कडून वसूल करावा. सदरील रस्ता तपासणाऱ्या अभियंत्यास बडतर्फ करावे अशा मागण्या खवशी येथील ग्रामस्थ अभिषेक देशमुख, आनंदापुरी गोसावी, उपसरपंच गणेश बाविस्कर, हरिप्रसाद कापडे, आशिष मराठे, विशाल सूर्यवंशी, देवेंद्र पवार यांनी केली आहे. सदरील मागण्या पूर्ण न झाल्यास आमरण उपोषण केले जाईल असे कळविण्यात आले आहे.