अमळनेर : तालुक्यातील गडखांब येथील रेशन दुकानदार मनमानी करत रेशन माल पुरविणे, मयत ग्राहकांचे नावावरील रेशन माल हडप करणे, अर्वाच्च्य भाषेत बोलणे आदी प्रकार करीत असल्याने तेथील सुमारे ३०० गावकऱ्यांनी संबंधित रेशन दुकानदाराचा परवाना रद्द व्हावा अशी मागणी तालुका तहसीलदार यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, संबंधित रेशन दुकानदार शासन नियमाप्रमाणे धान्य देत नाही, रेशन माल घेतल्याची पावती दिली जात नाही, रेशन धान्य आल्यानंतर तीन दिवसांच्या आत रेशन न्यावे अन्यथा रेशन मिळणार नाही असे सांगितले जाते. एखादा ग्राहक मयत झाल्यास नाव कमी न करता ते धान्य हडप केले जाते. कुटुंबातील अथवा कोणी व्यक्तीने विचारणा केली असता धमक्या दिल्या जातात. अशी तक्रार दिलीप पाटील, दीपक पाटील, मनोहर पाटील, किशोर पाटील, दिनेश पाटील, सर्जेराव पाटील, प्रकाश पाटील, सुपडू पाटील, महेंद्र पाटील, चंद्रकांत पाटील, ताराचंद पाटील, वालजी पाटील, सरलाबाई पाटील आदी ३०० ग्रामस्थांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे. दुकानाचा परवाना रद्द करुन नवीन रेशन दुकान जोडण्यात यावे अशी विनंती करण्यात आली आहे.