
अमळनेेर : जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, सुंदरपट्टी (आदर्श गांव) येथे आज दि.१५ सप्टेंबर रोजी शालेय व्यवस्थापन समितीचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने समिती पुर्नगठणासाठी शाळेतील विद्यार्थी पालकांची सभा घेण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी गावचे प्रथम लोकनियुक्त सरपंच सुरेश अर्जुन पाटील होते. शासन निर्णयानुसार समिती कशाप्रकारे गठीत करावयाची ? याबद्दल मुख्याध्यापक संजय जगताप यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. संवर्गानुसार आरक्षण, महिला आरक्षण, वर्गनिहाय आरक्षण याबद्दल माहिती दिली. त्यानुसार सर्व उपस्थित पालकांनी निवडणूक न घेता शासन निर्णयानुसार बिनविरोध शालेय व्यवस्थापन समितीची सर्वांनुमते निवड करण्यात आली.
नवनिर्वाचित सर्व सदस्यांमधून अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यक्षपदी दत्तात्रय उद्धव पाटील यांची तर उपाध्यक्ष पदी सौ.अर्चना गुलाब पाटील यांची सर्वांनुमते निवड करण्यात आली. नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य यांचा सभेचे अध्यक्ष सुरेश पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माजी अध्यक्ष अमृत लांडगे, ग्रा.पं. सदस्या सौ.पूनम पाटील, सौ.छाया नागो भिल, प्रतिष्ठीत नागरीक निळकंठ पाटील, गोकुळ पाटील, केशव पाटील, लोटन पाटील, अंगणवाडी सेविका, मदतनीस, ग्रा.पं. कर्मचारी मोतीलाल पाटील, शिक्षकवृंद उपस्थित होते. सभा यशस्वीतेसाठी सौ.जयश्री बारड, सौ.स्मिता सोनवणे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विश्वास पाटील यांनी केले. मुख्याध्यापक संजय जगताप आभार मानले.
