शेतकऱ्यांना पिक नुकसानीची तक्रार दाखल करण्यासाठी कृषी आयुक्तालयाचा दिलासा

घटना घडल्यापासून ७२ तासाच्या आत विमा कंपनीला नुकसानी बाबतची सुचना देणे आवश्यक

पुणे : महाराष्ट्रातील बहुतांश भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान होऊन शेतकऱ्यांना त्याचा आर्थिक फटका बसला. बळीराजा हवालदिल झाला होता. यातच नुकसानीनंतर पिक नुकसानीची तक्रार दाखल करायची कशी ? असा पेचही निर्माण झाला. शिवाय दिवसागणिक नियामवलीत बदल होत असल्याने संभ्रमावस्थेतील शेतकऱ्यांना आता कृषी आयुक्तालयाकडूनच दिलासा मिळाला आहे. स्थानिक नैसर्गिक आपत्ती, गारपीट, ढगफुटी, शेत जमीन जलमय झाल्यास तसेच वीज कोसळून लागलेली आग या प्रसंगी नु्कसानीची तक्रार नोंदविण्यासाठी आता वेगवेगळे सहा पर्याय शेतकऱ्यांसमोर राहणार आहेत.

यात, १) शेतकऱ्यांना ‘क्रॉप इंन्शुरन्स अ‍ॅप’ या माध्यमातून झालेल्या नुकसानीची माहिती स्वतः भरायची आहे. याद्वारे माहिती भरल्यानंतर अधिकारी कर्मचारी हे पंचनाम्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर येणार आहेत. २) विमा कंपनीने १८००४१९५००४ हा टोल फ्री क्रमांक दिला आहे. याद्वारेही शेतकरी झालेल्या नुकसानीची माहिती सांगू शकतात. ३) तालुक्याच्या ठिकाणी विमा कंपनीच्या कार्यालयात शेतकरी हे ऑफलाईनही तक्रार करु शकतात. कंपनीकडून देण्यात आलेल्या फॅार्मवर आवश्यक ती माहिती भरावी लागणार आहे. ४) शेतकऱ्यांना कृषी कार्यालयातही तक्रार नोंदिवता येणार आहे. संबंधित मंडळ कृषी अधिकाऱ्याकडे तक्रारीचा अर्ज द्यावा लागणार आहे. ५) पिक विमा कंपनीचे ro.mumbai@aiconfindia.com / pikvima@aicofindia.com हे मेल आयडी आहेत. यावरही तक्रार नोंदविता येणार आहे. ६) ज्या बॅंकेत शेतकऱ्यांनी आपला विमा भरलेला आहे त्या बॅंकेच्या शाखेतही शेतकऱ्यांना तक्रारीचा अर्ज करता येणार आहे.

सुरुवातीस केवळ ऑनलाईनद्वारेच तक्रार नोंदविण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, स्थानिक पातळीवर नुकसानीसंदर्भातील सर्व माहिती ही अ‍ॅपद्वारे भरणे शक्य नाही. शेतकऱ्यांच्या तक्रारी लक्षात घेता पुन्हा ऑफलाईन तक्रारही नोंदविता येणार असल्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या. शेतकऱ्यांची होणारी गर्दी आणि तारांबळ पाहता, आता कृषी आयुक्तालयाने वेगवेगळे सहा पर्याय दिले आहेत. त्यापैकी कोणत्याही एका पर्यायानुसार शेतकऱ्यांना नुकसानीची तक्रार दाखल करता येईल. नुकसानीची घटना घडल्यापासून ७२ तासाच्या आत विमा कंपनीला याबाबतची सुचना देणे आवश्यक असून वेळेत तक्रार दाखल झाल्यास विमा कंपनीला योग्य ती कारवाई करता येणार आहे.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!