रोहयो अंतर्गत येणाऱ्या दोन इंधन विहिरींमधील अंतराची अट रद्द करण्याची आमदार अनिल पाटील यांची मागणी

अमळनेर : रोजगार हमी योजना अंतर्गत शेतकऱ्यांना इंधन विहिरीचे अनुदान दिले जाते. या अनुदानाचा सर्वसामान्य व गोरगरीब शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लाभ मिळावा यासाठी रोहयो अंतर्गत देण्यात येणाऱ्या दोन इंधन विहिरींमधील १५० मीटर अंतराची अट रद्द करण्यात यावी अशी मागणी अमळनेरचे आमदार अनिल पाटील यांनी मंत्रालयात पार पडलेल्या बैठकीत रोहयो मंत्री नामदार संदीपान भुमरे यांचेकडे केली. भूजलावर आधारित लघु सिंचन योजनेच्या विकासासाठी १९७२ च्या दरम्यान राज्य सरकारने भूजल सर्वेक्षण व विकास संस्था (जीएसडीए) स्थापन करण्यात आलेली आहे. याद्वारे मागील शासन नियमानुसार दोन इंधन विहिरींमध्ये १५० मीटर एवढं अंतर असणे आवश्यक असल्याची अट शेतकऱ्यांना घातली गेलेली आहे. अंतराची असलेली ही अट सरकारने काढूनच टाकावी यासाठी मंत्री महोदयांच्या दालनात अनिल पाटील यांनी आपली भूमिका मांडली.

सर्वसामान्य व गोरगरीब शेतकऱ्यांना या अनुदानाचा जास्तीत जास्त लाभ मिळावा. ज्यामुळे शेतीची प्रगती वाढेल. अंतराची अट लावतांना संबंधित विभागाने पिण्याचा पाण्याचा स्रोत कायमस्वरूपी टिकला पाहिजे हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतलेला असेल मात्र विभागाने शेतीला व शेतीच्या प्रगतीला समोर ठेऊन हा निर्णय घेेणे अपेक्षित असल्याचं आमदार अनिल पाटील यांनी अधोरेखीत केले. महत्वाचं म्हणजे अनुदानित विहिरींसाठी अंतराचा हा नियम लावला गेला आहे. मात्र एखादा सधन शेतकरी आपल्या क्षेत्रात कुठेही, कितीही खाजगी विहिरी खोदू शकतो यामुळे कुठेतरी दुजाभाव होतोय व गरीब शेतकरी गरीबच राहतोय. हे कुठे तरी थांबले पाहिजे यासाठी संबंधित विभागाने पुढाकार घेऊन नवीन शासन आदेश निर्गमित करावा असे आमदार अनिल पाटील यांनी सुुचविले. तांत्रिक अडचणी दूर करून संबंधित जलसंपदा, जलसंधारण, रोहयो, कृषी, सामाजिक वनीकरण तसेच शासनाच्या ज्या विभागांकडून पाणी आडवा.. पाणी जिरवा अशा योजना राबविल्या जातात त्या सर्व अधिकाऱ्यांना सोबत घेऊन त्यांची कमिटी तयार करुन एक बैठक आयोजित करावी. जेणेकरून पाणी अडवलं गेलं पाहिजे. त्याचा निचरा देखील झाला पाहिजे. यामुळे विहिरींची पाणी पातळी वाढवून शेतकऱ्यांना कसा उपयोग होईल याच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न झाले पाहिजेत. जीएसडीए चा दाखला न मिळाल्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील अशा अनेक सर्वसामान्य शेतकऱ्यांना अंतराच्या अटीमुळे लाभ मिळत नाही यावर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन रोहयो मंत्री ना.संदीपान भुमरे यांनी आमदार अनिल पाटील यांना दिले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!