
अमळनेर : तालुक्यातील मंगरूळ औद्योगिक वसाहतीचे विस्तारीकरण व मुलभूत सुविधांसाठी शासन स्तरावरून निधी उपलब्ध व्हावा यासाठी अॅडव्होकेट ललिता पाटील व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक पराग पाटील यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचेकडे नुकतीच लेखी निवेदनाद्वारे मागणी केली. चेअरमन जगदीश चौधरी व त्यांचे सहकारी संचालक यांच्या मागणीनुसार अमळनेर औद्योगिक वसाहतीची स्थापना करण्यात आली. सन १९८० मध्ये शासकीय जमिनीवर उद्योगांसाठी प्लॉट वितरित करण्यात आले. या शासकीय जागेवर लहान-मोठे पंच्याहत्तर उद्योग सुरु करण्यात आल्याने अनेकांना रोजगार उपलब्ध झालेला आहे. संस्थेला कुठल्याही प्रकारे उत्पन्नाचा स्त्रोत नसल्याने रस्ते, लाईट, वीज, पाणी, ड्रेनेज आदी सुविधा पुरवणेसाठी अडचणी येतात. केंद्र शासनाने कोरोना काळ असताना MSME सेक्टर साठी दिलेला मदतीचा हात व शासकीय धोरणास अनुसरून कोरोना काळात देखील उद्योजकांनी आपले उद्योग चालवून सतत रोजगार उपलब्ध करुन दिला आहे. परंतु उद्योजकांना मुलभूत सुविधा नसल्याने अडचणी येत आहेत अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने उद्योगधंद्यांचा विकास खुंटलेला आहे. सहकारी संस्थेतर्फे विनंती की, उद्योगांचा विस्तार व वाढ करण्यासाठी निधी उपलब्ध करून मिळावा, औद्योगिक वसाहत विस्तारीकरणासाठी अतिरिक्त शासकीय जागा उपलब्ध करून मिळावी व वसाहतीत मुलभूत सुविधा उपलब्ध करुन मिळाव्यात अशा मागण्या अॅडव्होकेट ललिता पाटील व पराग पाटील यांनी लेखी निवेदनाद्वारे केल्या आहेत.