
मुंबई : कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर बंद असलेल्या शाळा ४ ऑक्टोबर पासून सुरु होणार अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी केली. शाळेतील प्रत्यक्ष शिक्षण कोरोना संसर्गामुळे बंद होते ठेवून ऑनलाईन शिक्षण सुरु होते. कोरोनाचा प्रभाव कमी होत असल्या कारणामुळे शाळा सुरु करण्याचा प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाने माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे दिला होता. या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे.
टास्क फोर्सच्या सुचनांनुसार, कोविड-१९ च्या आरोग्यविषयक सर्व सुचनांचे पालन करुन राज्यातील शाळा ४ ऑक्टोबर पासून सुरु होणार आहेत. राज्यातील निवासी शाळा संदर्भात कोणताही निर्णय अद्याप घेण्यात आला नाही. शाळा सुरु करताना पालकांची मंजुरी आवश्यक आहे. शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे लसीकरण सक्तीचे आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्र्वभूमीवर मास्क, सॅनिटायझर व शारीरिक अंतर या सुचनांचे पालन सर्वांनाच करावे लागणार आहे. ग्रामीण भागामध्ये इयत्ता ५ वी ते इयत्ता १२ वी व शहरी भागांमध्ये इयत्ता ८ वी ते इयत्ता १२ वी चे वर्ग सुरु होणार आहेत. पालकांनी व शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याबाबत सुचना शिक्षण मंत्र्यांनी दिल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या आरोग्य व सुरक्षा या गोष्टींना प्राधान्य देण्यात यावे यांचा पुर्नउच्चार शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केला. शाळांमध्ये कोणत्याही प्रकारच्या सांघिक कृती व सांघिक खेळ होणार नाहीत. अशा सुचना यावेळी देण्यात आल्या.