कोरोनाच्या रुग्ण संख्येत घट असली तरी अधिक सावध राहावे लागणार

मुंबई : राज्यातील सर्वधर्मियांसाठी ७ ऑक्टोबरपासून मंदिरे खुली होणार आहेत. नवरात्रीच्या पहिल्या दिवशीपासून आरोग्याचे नियम पाळून मंदिरे भक्तांसाठी खुली करण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. राजकीय विरोधकांनी याआधी सर्वधर्मियांसाठी मंदिरे खुली करण्यासाठी आंदोलनेही केली होती.
मुख्यमंत्री यांनी म्हटले आहे की, कोरोना काळात दुसऱ्या लाटेचा मुकाबला केल्यानंतर आता आपण संभाव्य तिसऱ्या लाटेशी लढण्याचे नियोजन केले आहे. सर्व प्रकारची काळजी घेत हळूहळू बऱ्याच बाबतीत निर्बंध शिथिल करीत आलो आहोत. सध्या कोरोनाच्या रुग्ण संख्येमध्ये घट दिसून येत असली तरी आपल्याला अधिक सावध राहावे लागणार आहे. चेहऱ्यावर मास्क, सुरक्षित अंतर, जंतुनाशका चा वापर हा झालाच पाहिजे. धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापन समितीची यामध्ये मोठी जबाबदारी आहे हे विसरु नये, असे देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.