अमळनेेर : राज्य सरकारने परीपत्रक काढून ‘ई-पीक पाहणी’च्या माध्यमातून खरीप पिकांच्या नोंदणीस आता १५ ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ दिली आहे. एकीकडे पावसाचे थैमान असताना ई-पीक पाहणीच्या माध्यमातून पिकांची नोंदणी करायची कशी ? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला होता. मात्र, आता पिकांच्या नोंदणीस १५ ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ मिळाली असल्याने शेतकऱ्यांनी आता घाबरण्याचे कारण नाही. खरीप पिकांच्या नोंदणीस ३० सप्टेंबर ही अंतिम मुदत होती पण अतिवृष्टी आणि पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे अनेक शेतकऱ्यांना खरीप पिकांची नोंदणी करता आली नव्हती.
‘ई-पीक पाहणी’च्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपल्या शेतातील पिकांची नोंद ही स्वत: करायची आहे. ‘ई-पीक पाहणी’ द्वारे शेतकऱ्यांनी केलेल्या नोंदणीमुळे कारभारात पारदर्शकता येणार आहे. शिवाय यंत्रणेत कोणी मध्यस्थी नसल्याने थेट लाभ हा शेतकऱ्यांना होणार आहे. ‘ई-पीक पाहणी’च्या माध्यमातून पिकांची नोंदणी या उपक्रमाचे हे पहिलेच वर्ष आहे. हा ऐतिहासक निर्णय असून शेतकऱ्यांची गैरसाय ही टळणार आहे.