पावसाळी पाण्याच्या समस्यांबाबत सामाजिक कार्यकर्ते प्रशासनाच्या दारी; नागरिक संतप्त

उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन केली समस्यांबाबत चर्चा

अमळनेर : शहरातील परिसरात वर्षानुवर्षे पावसाळी पुराच्या पाण्याने नागरिकांची व घरांची होणारी दुरावस्था कायमस्वरूपी थांबविण्यासाठी प्रशासनाने ठोस कार्यवाही करावी अन्यथा नागरिक आंदोलन करतील अशा आशयाचे निवेदन येथील सामाजिक कार्यकर्ते यांनी उपविभागीय अधिकारी सिमा अहिरे यांना नुकतेच दिले. याच प्रश्नावर उपविभागीय अधिकारी कार्यालयात बांधकाम विभाग व नगरपालिका अधिकाऱ्यांची बैठक लावलेली असतांनाच धुळे रोड, पिंपळे रोडवरील आर.के.नगर, उत्कर्ष नगर, आदर्श नगर, विठ्ठल नगर परिसरातील नागरिकांंसह महिला मोठया संख्येने उपविभागीय अधिकारी कार्यालयात हजर होऊन वर्षानुवर्षांच्या पावसाळी पाण्याच्या समस्यांबाबत संतप्त भावना व्यक्त केल्या. मा.आ.साहेबराव पाटील यांनी प्रशासन व बांधकाम विभागाकडून सदर प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे नागरिकांना सांगितले. त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्याने नागरिक माघारी गेलेत. याप्रसंगी न.पा.चे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, प्रशासन अधिकारी संजय चौधरी, डिगंबर वाघ, ॲड.यज्ञेश्वर पाटील, नगरसेवक शेखा हाजी, बांधकाम विभागाचे अधिकारी महाजन, धुळे रोडचे ठेकेदार व अभियंता हजर होते.

अमळनेर नगरपालिका हद्दीतील धुळे रोड परिसरातील आर.के.नगर, भालेराव नगर, गुरुकृपा कॉलनी, कलागुरु ड्रीमसिटी परिसरातील नागरिकांच्या वस्तीची पडणाऱ्या पावसामुळे तसेच मंगरूळ शिवारातून वाहून येणाऱ्या पुराच्या लोंढ्यांमुळे वर्षानुवर्षे अत्यंत बिकट व दयनीय अवस्था झालेली आहे. यावर कायमस्वरूपी उपाययोजना होणे गरजेचे आहे अशी मागणी यावेळी उपविभागीय अधिकारी यांचेशी चर्चा करतांना सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे यांनी केली. तर पूर्वी धुळे रोडच्या दोन्ही बाजूने पश्चिमेकडून पूर्वेकडे नाल्याच्या प्रवाहातून नैसर्गिक उताराच्या दिशेने पाणी उतरून जायचे. सार्वजनिक बांधकाम विभागाने सदर रस्त्याचे काम केल्यानंतर नाला लहान झालेला असून एकाच बाजूने पाणी वाहत आहे. आर.के.नगर, भालेराव नगर व गुरुकृपा कॉलनीतूनही नैसर्गिक नाले प्रवाहित होते मात्र कालांतराने सदरचे नाले नष्ट झाले. ओपन प्लेस ला पाणी साचते. आहे त्या गटारींची पुराचे पाणी वाहून नेण्याची क्षमता नसल्याने आर.के.नगरचा मुख्य रस्ता पावसाळ्यात पाण्याखाली राहतो. एका भागातील पाणी दुसऱ्या भागात वाहून जाण्यासाठी रस्त्याखालून पाईप टाकलेले नाहीत. शेतातील पुराचे पाणी वाहून जाण्यासाठी मोठे नाले कोरून कृषी उत्पन्न बाजार समितीमागील नाल्याला व पिंपळे नाल्याला जोडलेले नाहीत. लहान गटारी यासाठी कुचकामी ठरतात असेही यावेळी स्थानिक रहिवासी काशिनाथ सगरे, पी.सी.पाटील यांनी सांगितले. साचलेल्या पाण्यामुळे रोगराई पसरून नागरी आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे. दरवर्षी या भागातील पुराचे पाण्याच्या बातम्या येतात. नागरिकांच्या तक्रारीनंतर मुरूम माती टाकून तात्पुरती मलमपट्टी होते मात्र कायमस्वरूपी उपाययोजना होत नसल्याने स्थानिक नागरिकांची मोठी मानसिक, शारीरिक व आर्थिक हानी होत असते. सदर प्रश्नात नगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महसूल विभागाने एकत्रित कार्यवाही करून परिसरातील नैसर्गिक नाल्यांचा प्रवाह मोकळा करावा, अशी कळकळीची विनंती केली आहे. ठोस कार्यवाही न झाल्यास वेळप्रसंगी रहिवासी रस्त्यावर उतरून आंदोलनाचा पवित्रा घेतील असेही निवेदनात नमूद करण्यात आलेले आहे. यावेळी उपविभागीय अधिकारी कार्यालयात सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे, नरेंद्र पाटील, काशिनाथ संगरे, गुरुकृपा कॉलनीतील प्रा.लिलाधर पाटील, आर.के.नगर चे पी.सी.पाटील, सुभाष पाटील, प्रकाश पाटील, किसन पाटील, रावसाहेब नेरपगार, आर.बी.पाटील उपस्थित होते.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!