राजस्थान, गुजरातच्या काही भागातून घेतली माघार

पुणे : यंदा १३ जुलै रोजी राजस्थानसह संपुर्ण भारत व्यापलेल्या नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी सुमारे दोन महिने २४ दिवस या भागात मुक्काम केल्यानंतर वायव्य भारतातून मान्सूनने परतीचा प्रवास सुरु केला आहे. पावसाने उघडीप दिली असून, आर्द्रतेती टक्केवारी चांगलीच कमी झाली आहे. बुधवारी (ता. ६) राजस्थान आणि गुजरातच्या काही भागातून मान्सून परतल्याचे हवामान विभागाने जाहीर केले असून उत्तर भारतातून मान्सून परतीचा प्रवास वेगाने होण्याचे संकेत दिले आहेत. हवामान विभागाने जाहीर केलेल्या नवीन वेळापत्रकानुसार, सर्वसाधारणपणे १७ सप्टेंबर ही मान्सून माघारीची दीर्घकालीन तारीख आहे. यंदा तब्बल १९ दिवस उशीराने मान्सून परतीच्या प्रवासाला निघाला आहे. बिकानेर, जोधपूर, जालोर आणि भूजपर्यंत भागातून मान्सूनने माघार घेतली आहे. पुढील तीन ते चार दिवसांत देशाच्या आणखी काही भागातून मान्सून परतण्यासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे.