अमळनेर : राज्य सहकारी निवडणूक प्राधिकारी यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचा संभाव्य निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. यानुसार, येत्या १७ जानेवारी २०२२ रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी मतदान होणार आहे. अनेक उमेदवार बाजार समितीत निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असून आपापल्या स्तरावर अंतर्गत मोर्चेबांधणी सुरू केली आहे. राजकीय पक्षाचे नेत्यांनी अद्याप उमेदवारांबाबत आपला निर्णय गुलदस्त्यात ठेवला आहे. सर्वच राजकीय पक्षाचे नेते जिल्हा बँकेच्या निवडणुकीत व्यस्त असल्याने जिल्हा बँकेची निवडणूक आटोपल्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आपापल्या पक्षाची उमेदवारी कोणाला ? याबाबतचा निर्णय घेतील.
जाहीर झालेल्या निवडणुक कार्यक्रमानुसार, दिनांक १० नोव्हेंबर रोजी जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करणे. दिनांक १० ते २२ नोव्हेंबर काळात निवडणूक अधिकारी यांनी प्रारुप मतदार यादीवर आक्षेप वा हरकती मागविणे. दि.२२ नोव्हेंबर ते १ डिसेंबर या काळात आलेले आक्षेप वा हरकतींवर निर्णय घेणे. दि.६ डिसेंबर रोजी जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणे. दि.१६ डिसेंबर रोजी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर करणे. दि.१६ ते २२ डिसेंबर दरम्यान नामनिर्देशन पत्र विक्री व स्विकृती करून प्रसिद्ध करणे. दि.२३ डिसेंबर रोजी नामनिर्देशन पत्र छाननी करणे. दि.२४ डिसेंबर रोजी वैध नामनिर्देशन पत्र यादी ची प्रसिद्धी करणे. दि.२४ डिसेंबर ते ७ जानेवारी अर्ज माघार घेणे. दि.१० जानेवारी रोजी निवडणूक चिन्हासह अंतिम यादी प्रसिद्ध करणे. दि.१७ जानेवारी रोजी मतदान तर दि.१८ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे.