राष्ट्रविचार प्रबोधन कार्यक्रमांतर्गत शांताराम पाटील स्मृती व्याख्यानमालेत केले प्रबोधन

अमळनेर : संत तुकारामांच्या सु विचारातून शिवरायांनी स्वराज्य निर्माण केले. महापुरुषांनी सांगितल्याप्रमाणे जन्माआधी व जन्मानंतर काहीही नसते म्हणून आहे ते जीवन उत्तमप्रकारे जगा ! असे प्रतिपादन पुणे येथील सुप्रसिद्ध लेखक व विचारवंत गंगाधर बनबरे यांनी केले. अमळनेर येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रविचार प्रबोधन कार्यक्रमांतर्गत शांताराम पाटील स्मृती व्याख्यानमालेत ते बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन क्रांतिसूर्य महात्मा फुले ,विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि स्मृतिशेष शांताराम पाटील यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून झाले. यावेळी मंचावर प्रमुख वक्ते गंगाधर बनबरे, प्रा.शिवाजीराव पाटील, प्रा.अशोक पवार, बन्सीलाल भागवत, प्रा.लिलाधर पाटील, रणजित शिंदे उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले की, संपूर्ण जगात स्वातंत्र्य समता व बंधुता या तत्त्वांवर आधारित लोकशाही ही माणूस केंद्रस्थानी ठेवून निर्माण झालेली आहे म्हणून आपल्या प्रत्येक विचाराच्या केंद्रस्थानी कुठलीही अमूर्त संकल्पना न ठेवता माणूस म्हणून विचार केला तरच विचारात आणि समाजात परिवर्तन शक्य आहे. अवघाची संसार सुखे करा हा विचार व्यक्ती, कुटुंब, समाज व राष्ट्राचा विकास करेल प्रसंगी कर्ज घ्या स्वतःचा विकास साधा, ते फेडण्याचा प्रयत्न करा मात्र जीवन संपवू नका.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शिवाजीराव पाटील यांनी ‘बुद्ध फुले शाहू आंबेडकर यांचा विचार हा मानव केंद्रित विचार असून तत्त्वज्ञान आणि प्रत्यक्ष व्यवहार यांची सांगड घालण्यात समृद्धपणे कसे जगता येईल. कालानुरूप आपल्या विचारात बदल करून अधिकाधिक तार्किक आणि विज्ञानवादी होत जाणे यातूनच समाज उन्नत होईल स्वतःच्या प्रगतीसाठी प्रचंड कष्ट करा व समाजाशी असलेली नाळ कधीही तोडू नका ! असा सल्ला उपस्थितांना दिला.
प्रा.अशोक पवार प्रास्ताविकात सांगितले की, स्मृतिशेष शांताराम पाटिल यांच्यासारख्या सर्व सामान्य कार्यकर्त्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित या व्याख्यान कार्यक्रमातून हजारो कार्यकर्त्यांना बळ मिळेल. महापुरुषांच्या विचारांचा हा जागर १९ फेब्रुवारी पासून सुरु झालेला असून येत्या कालखंडात अमळनेर शहराच्या विविध भागांमध्ये महापुरुषांच्या जयंती व स्मृतिदिनानिमित्त यासारखे कार्यक्रम आयोजित केले जातील.
याप्रसंगी शिक्षण महर्षी पंजाबराव देशमुख परिषदेतर्फे महात्मा फुले जीवन गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रा.लिलाधर पाटील यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे यांनी तर आभार प्रदर्शन बन्सीलाल भागवत यांनी केले. याप्रसंगी जळगांव येथील मराठा सेवा संघाचे कार्याध्यक्ष राम पवार, पाडळसरे धरण समितीचे सुभाष चौधरी, नागरी कृती समितीचे संदिप घोरपडे, शिक्षण विस्तार अधिकारी अशोक बिऱ्हाडे, प्रा.सुभाष पाटील, मराठा सेवा संघाचे कैलास पाटील, नगरसेवक श्याम पाटील, अशोक पाटील, प्रा.राहुल निकम, पीडीएसपीचे विलास पाटील, अरुण देशमुख, पू.सानेगुरुजी ग्रंथालयाचे दिलीप सोनवणे, भाऊसाहेब देशमुख, सौ.छाया सोनवणे, वाल्मिक पाटील, भास्कर बोरसे, एस.डी.देशमुख आदींंसह सामजिक चळवळीतील कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.