दि.२२ मार्च ते २९ मार्च २०२२ पर्यंत आठ दिवसीय स्वयंसिद्धा अभियान शिबिर

अमळनेेर : तालुक्यातील मारवड येथील कै. न्हानाभाऊ म. तु पाटील कला महाविद्यालयातील युवती सभे अंतर्गत दि.२२ मार्च ते २९ मार्च २०२२ पर्यंत आठ दिवसीय स्वयंसिद्धा अभियान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दि.२२ मार्च रोजी अमळनेर येथील ज्येष्ठ क्रीडा प्रशिक्षक सुनील करंदीकर यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ प्रा.व्ही.डी.पाटील होते. याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून प्रशिक्षक श्री. सुनील करंदीकर, प्रा.व्ही.डी.पाटील, प्रा.डॉ. एस. एस. पाटील, प्रा.डॉ. नंदा कंधारे उपस्थित होते. प्रमुख अतिथींच्या हस्ते सरस्वती प्रतिमेचे पूजन व दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
सदर अभियानांतर्गत श्री. करंदीकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनींना स्वसंरक्षणासाठी सलग आठ दिवस रोज दोन तास ज्युडो – कराटे चे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रास्ताविक युवती सभा प्रमुख प्रा. डॉ. नंदा कंधारे यांनी केले. विद्यापीठाने विद्यार्थीनीच्या स्वसंरक्षणासाठी अभियानांतर्गत आखलेल्या कार्यक्रमाचा आराखडा त्यांनी प्रास्ताविकात मांडला.
श्री. करंदीकर यांनी स्वसंरक्षणासाठी ज्युडो कराटे प्रशिक्षण किती व कसे उपयुक्त आहे ? प्रत्येक विद्यार्थीनीने ते आत्मसात करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन केले. तर अध्यक्षीय भाषणात प्रा. व्ही. डी. पाटील यांनी समाजातील विकृती व मुलींच्या सुरक्षेचा आढावा घेतला. याप्रसंगी प्रा. डॉ. एस. एस. पाटील यांनीही मुलींना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एफ.वाय.बी.ए. ची विद्यार्थिनी कु. प्राजक्ता निकम हीने, तर आभार प्रदर्शन एफ.वाय.बी.ए. ची विद्यार्थिनी कु. ज्योत्स्ना निकम हीने केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक-प्राध्यापकेतर कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभले.