पाडळसरे धरण जनआंदोलन समितीचे वतीने खा.सुप्रियाताई सुळे यांना दिले निवेदन
धुळे : खान्देशातील धुळे, जळगांव जिल्ह्यातील ६ तालुक्यातील लाखो शेतकऱ्यांचे दृष्टीने महत्वपूर्ण असा निम्न्न तापी प्रकल्प पाडळसरे धरण २२ वर्षांपासून रखडलेला आहे. दरवर्षी शेकडो कोटींनी किंमत वाढणारे पाडळसरे धरणाचा समावेश पंतप्रधान कृषी सिंचन योजनेत करण्यासाठी खा.सुप्रियाताई सुळे यांनी खा.शरद पवार यांचे माध्यमातून पंतप्रधान व जलशक्ती मंत्रीकडे पुढाकार घेऊन खान्देशचे जीवनमान उंचवणारे धरण तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी पाडळसरे धरण जनआंदोलन समितीचे सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे यांनी लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे आयोजित धुळे येथील एस.एस.व्ही.पी.एस. महाविद्यालय येथे खान्देशस्तरीय विचार संवाद परिषदेत खा.सुप्रिया ताई सुळे यांचेकडे जाहीर भाषणातून केली. सदर प्रकल्पा ला केंद्र शासनाकडून भरीव निधी मिळावा म्हणून विविध माध्यमातून केंद्रीय नेतृत्वापर्यंत जनतेची मागणी पोहचविण्यासाठी जनआंदोलन समिती प्रयत्न करीत आहे.
यावेळी खा.सुप्रिया ताई सुळे यांनी सदर प्रश्नी केंद्रीय जलशक्ती मंत्री ना.गजेंद्र सिंह शेखावत व राज्याचे जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील यांचेशी बोलून येत्या जुलै संसदेच्या अधिवेशनात धरणाचा विषयाला चालना देण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन पाडळसरे धरण जनआंदोलन समितीचे प्रमुख कार्यकर्ते सुनिल पाटील, रणजित शिंदे, अजयसिंग पाटील, प्रशांत भदाणे, नरेंद्र पाटील आदींशी चर्चा करतांना दिले. समितीचे प्रमुख सुभाष चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली यावेळी जनआंदोलन समितीचे वतीने खा.सुप्रियाताई सुळे यांना सविस्तर निवेदन देण्यात आले. लोकसंघर्ष मोर्चा च्या नेत्या प्रतिभाताई शिंदे, मा.आ.प्रा.शरद पाटील आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते.