बाप हा बापच असतो कोणताही बाप स्वत:ला विसरुन मुलांचं आयुष्य सजविण्यात मशगुल असतो : मिलींद बागुल
अमळनेर : येथील मसाप चे कार्याध्यक्ष तथा कवी रमेश पवार लिखित ‘गावगाड्यांच्या पडझडीचे संदर्भ’ या काव्यसंग्रहाचा प्रकाशन रविवार, दिनांक ३ जुलै २०२२ रोजी छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह अमळनेर येथे सुप्रसिद्ध सिने गीतकार व अभिनेते बाबासाहेब सौदागर यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहित्यिक डॉ.मिलिंद बागुल होते. सोबत व्यासपीठावर साहित्यिक प्रा.बी.एन.चौधरी, निवृत्त तहसीलदार सुदाम महाजन, म.वा.मंडळाचे डॉ.अविनाश जोशी, प्रदीप पवार, चित्रकार राजुजी बाविस्कर, अथर्व पब्लिकेशन चे संचालक युवराज माळी, कवी रमेश पवार, प्रमिलाताई पवार आदी मान्यवर उपस्थित होते. साहजिकच रसिक श्रोत्यांना दर्जेदार साहित्यिक मेजवानी मिळाली.
अध्यक्षीय भाषणात मिलींद बागुल म्हणाले की, बाप हा बापच असतो. एकीकडे बापावर कविता करत असताना वृध्दाश्रम वाढू लागले अशी खंत त्यांनी व्यक्त केली. कोणताही बाप स्वत:ला विसरुन मुलांचं आयुष्य सजविण्यात मशगुल असतो. याची जाणीव असायला हवी.
बाळासाहेब सौदागर म्हणाले की, कवी असणं ही सगळ्यात श्रीमंत जात. भाषांवर आधारित नातं..सांगताना मराठी भाषेप्रती प्रेम व्यक्त केले. खानदेशाने कधी पदर पडू दिला नाही याची जाणीव करुन दिली.
प्रदीप पवार म्हणाले की, विज्ञान युगात गावगाडाच नव्हे तर सर्वच ठिकाणी पडझड झाली आहे. माणसा माणसात व राजकारणात ही तेच सुरु आहे असे सांगितले.
बी.एन.चौधरी म्हणाले की, ‘गावगाड्यांच्या पडझडीचे संदर्भ’ या काव्यसंग्रहात सर्वांचा विचार करुन आपल्या मनातील भावभावनांची तीन टप्प्यांत मांडणी केलेली आहे. माझीच कविता वाटणं हे कवीचं यश असल्याचं त्यांनी सांगितले. डॉ.अविनाश जोशी, अथर्व प्रकाशनचे युवराज माळी, निवृत्त तहसीलदार सुदाम महाजन यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले. सानेगुरुजी शाळेच्या विद्यार्थ्यांनी ‘शेतकरी बाप’ ही नृत्यनाटिका सादर केली. यावेळी श्रोत्यांनी भरभरुन प्रतिसाद दिला. बाळासाहेब सौदागर यांचे हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रणजित शिंदे, नवसारीकर मॅडम यांनी केले. दिलीप सोनवणे यांनी आभार मानले. कार्यक्रमास साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवर व साहित्य प्रेमी रसिक उपस्थित होते. संदीप घोरपडे, रमेश माने, रणजित शिंदे, दिलीप सोनवणे, भाऊसाहेब देशमुख यांचे सहकार्य लाभले.