अमळनेर : यशस्वी कथा वाचू नका त्यांनी केवळ संदेश मिळतो, अपयशाच्या कथा वाचा त्याने यशस्वी होण्यासाठी कल्पना मिळतात असे मत प्रताप महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ रमेश माने यांनी व्यक्त केले. भारताचे माजी राष्ट्रपती तथा मिसाईल मॅन डॉ ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात वाचन प्रेरणा दिवस साजरा करण्यात आला. वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून झालेल्या कार्यक्रमाचे उद्घाटनप्रसंगी प्रा.डाॅ.रमेश माने बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे, चिटणीस प्रकाश वाघ व ज्येष्ठ संचालक भिमराव जाधव यांनी केला.
प्रा.डाॅ.रमेश माने पुढे म्हणाले की, वाचनामुळे मेंदूला चालना मिळून नवनवीन शब्दांमुळे त्यांच्यात प्रगती होत असते. वाचनामुळे आपल्याला नवनवीन माहिती मिळते तसेच ज्ञानात भर पडते. सध्या आसपास अनेक मनोरंजनाची साधने उपलब्ध आहेत दूरदर्शन संगणक व त्यावर खेळले जाणारे खेळ मोबाईलवरील खेळाशी साधने आपल्याला मानसिक आनंद देतात परंतु वाचनामुळे आपण लेखकाने लिहिलेल्या ठिकाणी जाऊन आल्याचा आनंद मिळतो. आपण त्यातील प्रत्येक पात्र जगत असतो. डॉ कलाम यांचे कार्य आजच्या तरुण पिढीला प्रेरणादायी आहे.
वाचन प्रेरणा दिनानिमित्ताने सानेगुरुजी वाचनालयात पुस्तक पेढी तयार करून वाचन प्रेमींना पाच दिवस वाचण्यासाठी खुले ठेवले आहे. कार्यक्रमास सहाय्यक जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील जगताप, माजी उपप्राचार्य प्रा.एन.के.कुलकर्णी, ईश्वर महाजन, प्रसाद जोशी, दिपक वाल्हे व वाचन प्रेमी सुकलाल चौधरी, मगन भोई यांचेसह वाचनालयाचे कर्मचारी समिता धाडकर, रमेश सोनार, सुरेश जोशी, मधुकर बाळापूरे उपस्थित होते.