खानदेश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष हरी वाणी यांच्या हस्ते झाले महाशिबिराचे उद्घाटन
अमळनेर : विद्यार्थ्यांनी पोलीस भरतीची परीक्षेची तयारी करताना कधीही आपला संयम ढवळू देऊ नये, योग्य नियोजनाने यश मिळेल. स्वतःवर विश्वास ठेवा. यश अन अपयश कधीही कायम नसते. जिद्द व चिकाटी असेल तर आपण इच्छित स्थळी पोहोचू शकतो असे मत नागपूर महानगर विकास प्राधिकरणाचे उपसंचालक कपिल पवार यांनी नुकतेच केले. प्रताप महाविद्यालय, प्रताप तत्वज्ञान केंद्र व उत्कर्ष खान्देशी अधिकारी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसीय भव्य मोफत पोलीस भरती प्रशिक्षण महाशिबीर प्रसंगी बोलत होते. या शिबिरात सुमारे २५० विद्यार्थी- विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला.
खानदेश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष हरी वाणी यांच्या हस्ते महाशिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी राजेंद्र खैरनार, युनियन बँकेचे वरिष्ठ प्रबंधक मयूर पाटील, सुभेदार मेजर नागराज पाटील, प्रताप तत्त्वज्ञान केंद्राचे मानद सचिव प्रा.दिलीप भावसार, माजी सरपंच नरेंद्र पाटील, प्रा.डॉ.विजय तूंटे, डी.ए.धनगर, व्ही.ए.पवार, रवींद्र मोरे, प्रा.बागुल, प्रा.हर्षवर्धन जाधव, देवराम मोरे, देवेंद्र साळुंखे, मोहित मावळे आदी उपस्थित होते. यावेळी बोहरा येथील शेतकरी आसाराम धनगर यांनी अभ्यासिकेसाठी जमीन दान केली होती या पार्श्वभूमीवर त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. प्रतापियन्स प्रेरणा प्रबोधिनी पुरस्कार मिळाल्याबद्दल तसेच इस्रो विज्ञान अभ्यास दौऱ्यासाठी निवड झालेले उमेश काटे यांचाही सत्कार करण्यात आला.
प्रथम सत्रात बुद्धिमत्ता या विषयावर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक खेमचंद्र पाटील (जळगाव) यांनी मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्राचे वेळी लायन्स क्लबचे चेअरमन तथा खान्देश शिक्षण मंडळाचे कार्यउपाध्यक्ष योगेश मुंदडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रताप तत्वज्ञान केंद्राचे मानद सचिव प्रा.डॉ.दिलीप भावसार, विभाग प्रमुख प्रा.डॉ.राधिका पाठक आदी उपस्थित होते. यावेळी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक देविदास साबळे (पाचोरा) यांचे “मराठी व्याकरण” यावर व्याख्यान झाले. सायंकाळी मैदानावर विद्यार्थ्यांची शारीरिक चाचणी प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी सुभेदार मेजर नागराज पाटील, पोलीस समाधान पाटील, पोलीस चंदन पाटील, नायब सुभेदार बी.पी.पाटील, राजेंद्र सूर्यवंशी (मारवड), निवृत्त आर्मी अधिकारी नवल शिरसाठ, निवृत्त आर्मी अशोक चौधरी, पोलीस प्रविण पाटील आदी उपस्थित होते. उमेश काटे यांनी सूत्रसंचालन केले.
पुढील दोन दिवसांत यांचे मिळणार मार्गदर्शन
उद्या (ता ११) सकाळी साडेआठला आर के अकॅडमी चे संचालक रविंद्र कुंभार (जळगांव) यांचे गणित विषयावर व्याख्यान होणार आहे तसेच दुपारी दोनला मार्गदर्शक वामन पाटील (चाळीसगाव) यांचे सामान्य ज्ञान या विषयावर व्याख्यान होणार आहे. सोमवारी (ता १२) सकाळी साडेआठला मराठी व्याकरणावर देविदास साळवे (पाचोरा)यांचे तर सायंकाळी तीन ला सुभेदार मेजर नागराज पाटील यांचे “सामान्यज्ञान” यावर व्याख्यान होणार आहे. सायंकाळी पाचला बक्षीस वितरण होणार आहे.