मारवड येथील कै. न्हानाभाऊ म.तु.पाटील कला महाविद्यालयात ‘महात्मा ज्योतिबा फुले’ यांची जयंती साजरी

मारवड (ता.अमळनेर) : येथील कै. न्हानाभाऊ म.तु.पाटील कला महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा केंद्र व समाजशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक ११ एप्रिल रोजी ‘महात्मा ज्योतिबा फुले’ यांची १९६ वी जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान हिंदी विभाग प्रमुख प्रा. डॉ. संजय महाजन होते. प्रमुख वक्ते म्हणून संरक्षणशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. जितेंद्र माळी होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. स्पर्धा परीक्षा केंद्र समन्वयक प्रा. डॉ. माधव वाघमारे यांनी प्रास्ताविकातून महात्मा जोतीराव फुले यांच्या विचारांची प्रासंगिकता मांडली.

कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा. डॉ. जितेंद्र माळी यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्त्री शिक्षण, छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोध व शिवजयंती उत्सव, बालहत्या प्रतिबंधक गृह, प्रौढ शिक्षण वर्ग, सत्यशोधक समाजाची स्थापना, नाभिकांचा संप, पुणे नगरपालिका सदस्य, आयुक्त व कॉन्ट्रॅक्टर म्हणून केलेले कार्य, लिहीलेले विविध ग्रंथ व दिनबंधू वृत्तपत्राचे प्रकाशन तसेच दलितांच्या उद्धारासाठी केलेल्या विविध कार्याचा आढावा घेवून महात्मा ज्योतिबा फुले यांचे भारताच्या जडणघडणीत योगदान यावर सखोल मांडणी केली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. संजय महाजन यांनी अध्यक्षीय भाषणात स्त्री शिक्षण व समाज उद्धारासाठी महात्मा फुले दाम्पत्याच्या योगदानाबद्दल प्रकाश टाकून आजच्या तरुणांनी त्यांच्या विचारांचा आपल्या जीवनात आदर्श घ्यावा, असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाजशास्त्र विभाग प्रमुख सौ.नंदा कंधारे यांनी तर आभार प्रदर्शन इतिहास विभागप्रमुख प्रा. डॉ. दिलीप कदम यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले.


Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!