नुसतेच शिक्षण घेण्याला अर्थ नसून शिक्षणात विद्वत्ता असायला हवी तरच समाजव्यवस्था बदलता येते : प्रा.डॉ.लिलाधर पाटील
अमळनेर : येथील धनदाई महाविद्यालयाच्या यशवंत सभागृहात महात्मा जोतीराव फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियानांतर्गत
युवा कल्याण प्रतिष्ठानच्या पुढाकाराने काल दिनांक ९ एप्रिल रोजी वक्ते प्रशिक्षण कार्यशाळा भरली होती. या कार्यशाळेचे प्रमुख वक्ते म्हणून प्रा. डॉ. लिलाधर पाटील होते. सोबत व्यासपीठावर धनदाई महाविद्यालयाच्या संचालिका प्रा.नंदा पाटील, माजी प्राचार्य एम.एस. शिंदे, युवा कल्याण प्रतिष्ठान चे अध्यक्ष प्रा.अशोक पवार, समन्वयक बापूराव ठाकरे उपस्थित होते. सौ.वसुंधरा लांडगे यांचे सोबत सुरात सूर मिसळत सामुहिक जिजाऊ वंदना होऊन मान्यवरांच्या हस्ते महात्मा जोतीराव फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रा.अशोक पवार यांनी प्रस्तावनेत वक्त्यांची कार्यशाळा या संकल्पनेबाबत भूमिका समजावून सांगितली.
प्रमुख वक्ते प्रा. डॉ. लिलाधर पाटील म्हणाले की, महात्मा जोतीराव फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव साजरा होत असताना वक्त्यांनी महापुरुषांचे दैवतीकरण करायचे नसून त्यांचे विचार समाज मनावर रुजविणे आवश्यक आहे. सर्व महापुरुष वेगवेगळे असले तरी ते एकाच विचारधारेचे आहेत. व्यापक स्वातंत्र्य, शिक्षण चळवळ ही त्यांची विचारधारा होती. वक्त्यांनी काय बोलले पाहिजे ? याबाबत त्यांनी वक्त्यांना मार्गदर्शन केले. सध्याच्या शिक्षण व्यवस्थेवर घणाघात करतांना.. नुसतेच शिक्षण घेण्याला अर्थ नसून शिक्षणात विद्वत्ता असायला हवी तरच समाजव्यवस्था बदलता येते. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतीराव फुले, छत्रपती शाहू, बाबासाहेब आंबेडकर यांची विद्वत्ता समाज सुधारणा करण्यासाठी महत्वाची ठरली. विद्या कशाला म्हणायचं ? तर.. जिथे मती, निती आणि गती असते. बोलके सुधारक व कर्ते सुधारक यातला फरक समजावून सांगितला. बाबासाहेब सांगतात.. आमचा लढा सत्ता, संपत्ती आणि भाकरीसाठी नाही तर स्वातंत्र्य व स्वाभिमानासाठी आहे. तो लढा त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिल्याचे सांगितले.
कार्यक्रमास सुमारे ५० हून अधिक विद्यार्थी व सिनियर वक्ते उपस्थित होते. सुनिल अहिरराव यांनी ‘आम्ही प्रकाश बीजे.. वाटा नव्या युगाच्या.. रुढवित चाललो’ तर अजय भामरे यांनी ‘चांदण्यांची छाया, कापराची काया.. माऊलींची माया, होता माझा भिमराया’ ही गीते गाऊन कार्यशाळेत रंगत आणली. अजिंक्य सोनवणे या विद्यार्थ्यांने बाबासाहेब आंबेडकर यांचेविषयी आपले विचार मांडले. बापूराव ठाकरे यांनी सूत्रसंचालन केले तर प्रेमराज पवार यांनी आभार मानले.