जेव्हा पुस्तके वाचून महापुरुषांचे विचार आचरणात आणले जातात तेव्हाच क्रांती जन्माला येते : प्रा.डॉ.लिलाधर पाटील

अमळनेर : येथील बॅंक कॉलनी, वामन नगर परिसरात काल दिनांक २१ एप्रिल रोजी महात्मा जोतीराव फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियानांतर्गत मास महोत्सव कार्यक्रम पार पडला. ‘जेव्हा पुस्तके वाचून महापुरुषांचे विचार आचरणात आणले जातात तेव्हाच क्रांती  जन्माला येते’ असे मत प्रमुख वक्ते प्रा.डॉ.लिलाधर पाटील यांनी यावेळी व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गुणवंत पवार होते. सोबत व्यासपीठावर युवा कल्याण प्रतिष्ठान चे अध्यक्ष प्रा अशोक पवार, अशोक पाटील, दिव्यचक्र चे संपादक संजय सूर्यवंशी, दयाराम पाटील, बापूराव ठाकरे, प्रेमराज पवार, अॅड शशिकांत पाटील, सोपान भवरे, अजय भामरे, वाल्मिक पाटील, बन्सीलाल भागवत, ए.डी.पाटील, शिसोदे सर, बन्सीलाल शिरसाठ आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रा अशोक पवार यांनी प्रास्ताविकातून राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियानाबाबतची भूमिका सांगितली.

प्रा.डॉ.लिलाधर पाटील म्हणाले की, समोर पुस्तके असणे म्हणजे क्रांती नव्हे. क्रांती तेव्हाच जन्माला येते जेव्हा पुस्तके वाचून महापुरुषांचे विचार आचरणात आणले जातात. विद्येत मती, निती, गती असेल तरच त्याला अर्थ प्राप्त होतो. त्यांनी ताराबाई शिंदे चा दाखला देत विधवा प्रथा, भ्रुणहत्या विषयी सविस्तर विवेचन केले. अंधश्रद्धेवर बोलताना ‘सब समस्या का हल… एक लोटा जल’ मुळे विद्वत्ता येणार असेल तर बाकी काही करायची गरज कां असावी ? असा प्रश्न उपस्थित करुन बोलके व कर्ते सुधारक समजावून दिले.

पत्रकार अजय भामरे व बाल विद्यार्थी वक्ते कु.लावण्या पवन शिसोदे यांनी गीत गायले. कु.वेदांती दिपक शिसोदे ने संविधान, कु.स्वामिनी राजेंद्र चौधरी व कु.डिंपल दिपक शिसोदे यांनी सावित्रीबाई फुले, तर कु.श्वेता प्रशांत यादव, चि.भाविक संजय भामरे, चि.कृष्णा कैलास चांभार यांनी डॉ.बाबासाहेब यांचेविषयी विचार मांडले. कु.तन्वी सोनार ने महात्मा फुले, डॉ.आंबेडकर यांचे शिक्षणाबाबत विचार मांडत ‘जातीभेद थांबवायला हवा’ असा कानमंत्र दिला. कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन अशोक पाटील यांनी केले तर प्रेमराज पवार यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी दुर्गेश भाऊ, मयूर पाटील यांनी सहकार्य केले. कार्यक्रमास परिसरातील विद्यार्थी, महिला, नागरिक उपस्थित होते.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!