राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियानाचा हेतू काहीसा सफल
अमळनेर : ‘आपण सारे एक असून या वर्ण / जाती व्यवस्थेने बहुजन समाजाला मागे खेचण्याचे काम केले’ असे मत प्रमुख वक्ते शिक्षक दयाराम पाटील यांनी व्यक्त केले. पिंपळे रोडवरील शांतीनगर येथील भिल्ल वस्तीत काल दिनांक २० एप्रिल रोजी युवा कल्याण प्रतिष्ठान संचलित राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियानांतर्गत महात्मा फुले व बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव साजरा करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. खऱ्या उपेक्षित घटकांपर्यंत पोहचल्याने अभियानाचा हेतू काहीसा सफल झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाराष्ट्र पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष तथा दिव्यचक्र चे संपादक संजय सूर्यवंशी होते. सोबत व्यासपीठावर युवा कल्याण प्रतिष्ठान चे अध्यक्ष प्रा.अशोक पवार, बन्सीलाल भागवत गुरुजी, बापूराव ठाकरे, प्रेमराज पवार, अजय भामरे, विद्यार्थी वक्ता चि.अजिंक्य सोनवणे सोनवणे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते महात्मा जोतीराव फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
श्री दयाराम पाटील म्हणाले की, आपण सारे एक असून या वर्ण व्यवस्थेने बहुजन समाजाला मागे खेचण्याचे काम केले आहे. यामुळे समाजसुधारक यांनी सत्यशोधक समाज संस्था स्थापन करुन बहुजन समाजाच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली. बहुजन समाजाचे शोषण, अनिष्ट रुढी थांबवण्याचे काम या थोर समाज सुधारकांनी केले. त्यांचे विचार पुढे नेण्यासाठी शिक्षण ही काळाची गरज आहे असे सांगून त्यांनी आपल्या बहारदार वक्तृत्वाने कार्यक्रमात रंगत आणली. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना संजय सूर्यवंशी यांनी डॉ.बाबासाहेब यांच्या पत्रकारितेबाबत माहिती दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविकात प्रा.अशोक पवार यांनी राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियानाबाबतची भूमिका मांडली. पत्रकार अजय भामरे यांनी समाज सुधारकांचे विचार गाण्यातून प्रगट केले. बन्सीलाल भागवत गुरुजी यांनी उपस्थितांना समजेल अशा अहिराणी भाषेतून तर विद्यार्थी वक्ता अजिंक्य सोनवणे याने काही गोष्टी सांगून मनोगतातून विचार प्रबोधन केले. समन्वयक बापूराव ठाकरे यांनी सूत्रसंचालन तर प्रेमराज पवार यांनी उद्देशिकेचे वाचन केले. कार्यक्रमास वस्तीतील बालगोपाल, युवा वर्ग, महिला, पुरुष उपस्थित होते.