अमळनेरात होणार १८ वे विद्रोही साहित्य संमेलन; ढेकू रोडवरील ‘फोर्टस्’ येथे झाली नियोजनाबाबत बैठक

सर्व बहुजन महापुरुषांच्या वैचारिक व सांस्कृतिक आधारावर विद्रोही साहित्य संमेलन : संघटक किशोर ढमाले

अमळनेर : येथील ढेकू रोडवरील राजमुद्रा फाऊंडेशनच्या फोर्टस चे आवारात काल दि.२६ मे रोजी अमळनेरात होऊ घातलेल्या १८ वे विद्रोही साहित्य संमेलन नियोजनाबाबत औपचारिक बैठक झाली. यावेळी व्यासपीठावर विद्रोही चळवळीचे संघटक किशोर ढमाले, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष अविनाश पाटील, पुरोगामी परिवर्तनवादी चळवळीचे कॉम्ब्रेड महाजन, गौतम निकम, एच.टी.माळी, प्रा. अशोक पवार, प्रा. लिलाधर पाटील, मनोहर निकम उपस्थित होते. प्रा. लिलाधर पाटील यांनी प्रास्ताविक करताना मागील अनौपचारिक बैठकीचे इतिवृत्त वाचून दाखविले. सामाजिक कार्यकर्ते राजमुद्रा फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा नगरसेवक श्याम पाटील यांनी व्यासपीठावरील मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

अध्यक्षीय भाषणात अविनाश पाटील म्हणाले की, जेथे जेथे अ.भा.मराठी साहित्य संमेलन होणार तेथे तेथे विद्रोही साहित्य संमेलन होत असून अमळनेेर येथे प्रागतिक विचारांचे हे पाचवे संमेलन असेल. विद्रोही साहित्य संमेलनाची पार्श्वभूमी, आवश्यकता व त्यामागील कारणे त्यांनी सांगितली.

विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे संघटक किशोर ढमाले यांनी विद्रोही मराठी साहित्य संमेलन हे महात्मा फुले यांनी मांडलेल्या विचारांवर आधारित असून सर्व बहुजन महापुरुषांच्या वैचारिक व सांस्कृतिक आधारावर उभे असल्याचे सांगितले. धारावी येथे सन १९९९ ला ‘दादर विरुद्ध धारावी’ पहिलंच विद्रोही साहित्य संमेलन पार पडले. धारावी येथे झालेल्या पहिल्या विद्रोही साहित्य संमेलनापासून ते वर्धा येथे झालेल्या सतराव्या विद्रोही साहित्य संमेलनापर्यंतचा आढावा घेऊन हा आलेख सतत उंचावत गेल्याचे ते म्हणाले. ग्रंथालय समितीला महात्मा फुले यांनी दिलेल्या पत्राचा संदर्भ दिला. या पत्रात ‘एकीचं बीज शोधून काढा’ असे कळविले होते. त्यास अनुसरून विद्रोही साहित्य संमेलनाची सुरुवात असावी असेच म्हणावे लागेल. काहींनी मनुवाद जोपासण्याचे व पुरोगामी, परिवर्तनवादी यांच्यात फूट पाडण्याचे काम केले. हे करताना तशी खबरदारीही घेतली. निमंत्रण देतांनाही भेदभाव केला गेल्याचे काही संदर्भ दिले. बहुजन समाजाला ही सल लागून राहिली व त्यातून विद्रोही साहित्य संमेलनाचा जन्म झाला. बहुजन समाजाच्या दृष्टीने हा कळीचा कालखंड असून सावध राहण्याची गरज असल्याचे सांगितले. विद्रोही साहित्य संमेलन म्हणजे बहुजन समाजाची एकजुटीची भूमिका असून सर्व जातीधर्मास प्राधान्य दिले जाते असेही ते म्हणाले. विद्रोही साहित्य संमेलनात विविध विषयांवर गटचर्चा, विवेचन, आढावा घेतला जातो. सर्वांचा सहभाग कवी संमेलन, शाहिरी जलवा, नाटक, परिसंवाद, मुलाखत, युवा व बालकांसाठी मंच, विविध प्रदर्शन आदी कार्यक्रमात असतो.

सर्वश्री गौतम निकम, एच.टी.माळी, लिलाधर पाटील यांनीही आपले विचार मांडले. शेवटी प्रा. अशोक पवार यांनी पुरोगामी विचारांसाठी अमळनेरची भूमी पोषक असून या ठिकाणचे संमेलन यशस्वीच होईल असा आशावाद व्यक्त करून उपस्थितांचे आभार मानले. यावेळी पुरोगामी परिवर्तनवादी चळवळीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित कार्यकर्त्यांनी आपल्या मनातील सूचना शंका व नियोजना संबंधी काय करता येईल याविषयी चर्चा केली. येत्या काळात सर्वप्रथम जळगाव जिल्ह्यात व नंतरच्या काळात खानदेशात सर्व विभागांतील तालुकास्तरीय बैठका आयोजित करण्यात येणार आहेत.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!