राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियानांतर्गत ताडेपुरा येथे लोकमाता अहिल्याबाई होळकर जयंती साजरी

अमळनेेर :  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मित्र मंडळ, ताडेपुरा यांचे तर्फे दिनांक ३१ मे रोजी युवा कल्याण प्रतिष्ठान संचलित राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियानांतर्गत ताडेपुरा येथील दुर्गादेवी मंदिराजवळ लोकमाता अहिल्याबाई होळकर जयंती निमित्त व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर युवा कल्याण प्रतिष्ठान चे अध्यक्ष प्रा. अशोक पवार, शिवश्री मनोहर निकम, सौ. वसुंधरा लांडगे, दयाराम पाटील, रणजित शिंदे, बापूराव ठाकरे, प्रेमराज पवार, संजय सूर्यवंशी, जितु संदानशिव उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन चंद्रकांत कंखरे यांनी केले. सुरुवातीस लोकमाता अहिल्याबाई होळकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

प्रा. अशोक पवार यांनी प्रास्ताविक करताना थोर समाजसुधारक यांचा खरा इतिहास जनतेला माहिती व्हावा हा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले. युवा कल्याण प्रतिष्ठान मार्फत सन २०२३ या वर्षी शिवजयंती पंधरवाडा, महात्मा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती मास महोत्सव साजरा केला. येत्या ११ जून ला सानेगुरुजी स्मृती दिनानिमित्त वक्तृत्व स्पर्धा, २६ जूनला छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्त एकाच दिवशी १०० ठिकाणी व्याख्यान कार्यक्रमांचे आयोजन, याच धर्तीवर ताडेपुरा भागात अहिल्याबाई होळकर जयंती साजरी होत असल्याचे सांगितले. पुढील वर्षी २० मे ते ३१ मे सलग १२ दिवस मल्हारराव होळकर यांची जयंती साजरी करु. तसेच २८ महिला वक्त्या घडवू असे आश्वासित केले.

आपल्या मनोगतात सौ.वसुंधरा लांडगे म्हणाल्या की, कुटुंब व्यवस्था सुधारेल तेव्हा देश सुधारेल. अनेकदा जीवनात कठीण प्रसंग येतात त्यातून सावरायला मदत हवी असेल तर आपले विचार प्रगल्भ होण्याची गरज आहे. विधवा महिलांना चांगले जीवन जगता यावे यासाठी समाजातील अनिष्ट प्रथा मोडून काढाव्यात. विशेषतः महिलांनी उपास तापास कमी करावेत. महिलांनी पुढे यायला हवे. आपलं नशीब आपणच घडवितो असा मौलिक संदेश त्यांनी दिला. शिक्षक वक्ते दयाराम पाटील, विद्यार्थी वक्ते यश पाटील कु. भाविका वाल्हे, कु. तन्वी सोनार यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले. सौ.वसुंधरा लांडगे यांचे तर्फे विद्यार्थी वक्त्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रत्येकी १०० रुपये रोख बक्षिस देऊन कौतुक केले. कार्यक्रमास सर्वश्री नितीन निळे, चेतन जाधव, राहुल निकम, सोपान भवरे, अजय भामरे, धनराज कंखरे, जिभाऊ कंखरे, आनंदा कंखरे, धनराज चिंचोरे, परिसरातील सामाजिक कार्यकर्ते, नागरिक, महिला, युवक, युवती आदी उपस्थित होते. सुनिल चिंचोरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!