छत्रपती शाहू महाराज वाचताना प्रेरणा मिळते, व्यापकता समजते : मार्गदर्शक प्रा.डॉ.लिलाधर पाटील

अमळनेेर : युवा कल्याण प्रतिष्ठान संचलित राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियानांतर्गत राजश्री छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्त वक्त्यांसाठी मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. रविवार, दि.४ जून रोजी धनदाई महाविद्यालयाचे यशवंत सभागृहात झालेल्या कार्यक्रमात प्रा.डॉ.लिलाधर पाटील प्रमुख मार्गदर्शक होते. यावेळी व्यासपीठावर युवा कल्याण प्रतिष्ठान चे अध्यक्ष प्रा. अशोक पवार, शिवाजी पाटील, अशोक बिऱ्हाडे, भाऊसाहेब देशमुख उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
प्रास्ताविक करताना प्रा. अशोक पवार म्हणाले की, समाजसुधारकांचे विचार समाजात रुजवावे या उद्देशाने युवा कल्याण प्रतिष्ठान संचलित राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियानांतर्गत विविध उपक्रम राबविले जात आहेत. येत्या दिनांक ११ जून ला सानेगुरुजी स्मृती दिनानिमित्त वक्तृत्व स्पर्धा होणार असून दिनांक २६ जूनला छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी होत आहे. छत्रपती शाहू महाराज जयंतीला एकाच दिवशी १०० ठिकाणी व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करुन छत्रपती शाहू महाराजांचे कार्य व विचार जनतेत पेरण्यासाठी अनेक जण पुढे येत आहेत. वक्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ही कार्यशाळा घेण्यात आल्याचे सांगितले.
आपल्या मनोगतात अशोक बिऱ्हाडे म्हणाले की, समता प्रस्थापित व्हायला नको असे शासक वर्गाला वाटते. हे सांगताना त्यांनी राजे सयाजीराव गायकवाड व छत्रपती शाहू महाराज यांचा दाखला दिला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांनी शिक्षणासाठी प्रेरणा दिली. राज्यातील एकूण बजेटमधील २५ टक्के रक्कम शिक्षणावर खर्च केली. शिक्षणासाठी जो खर्च सध्या फक्त ३ ते ३.५ टक्के इतका केला जात असल्याची खंतही व्यक्त केली. न.प. चे निवृत्त प्रशासन अधिकारी भाऊसाहेब देशमुख म्हणाले की, वक्ते बोलताना मी अनेकदा पाहतोय पण आज वक्ते घडविताना पाहतो. वक्ता स्वतंत्र विचार करुन पेरणी करु शकतो तसे आपले नाव महाराष्ट्र भर गाजवूही शकतो असे सूचक विधान केले.

प्रमुख मार्गदर्शक प्रा.डॉ.लिलाधर पाटील यांनी छत्रपती शाहू महाराज यांचे जीवनावर प्रकाश टाकला. ते म्हणाले की, छत्रपती शाहू महाराज जयंती ला सामाजिक न्याय दिन म्हणून यादिवशी सर्वत्र फक्त फोटोला हार टाकले जातात. मराठेच छत्रपती शाहूंना मराठे समजत नाहीत, आंबेडकरी विचारात महात्मा फुले बसत नाहीत. त्यांना विशिष्ट जातीत बसवले जाते ही शोकांतिका आहे. यासाठीच विचार पेरण्याची गरज आहे. छत्रपती शाहू महाराज वाचताना प्रेरणा मिळते, व्यापकता समजते. ती समजून घेतली तरी जीवनात नक्की बदल होईल. त्यांचे कार्य समजून घेण्याची गरज आहे. बराच काळ २६ जून ऐवजी २६ जुलैला जयंती होत होती हेदेखील पटवून दिले. कोणत्याही योजनेची अंमलबजावणी कशी करावी ? हे शाहू महाराजांकडून शिकावं. वयाच्या २० व्या वर्षी त्यांनी राज्य कारभार हाती घेतला. जोपर्यंत तुम्ही सर्वसामान्य माणसात मिसळत नाही, त्यांचं म्हणणं, दु:ख समजून घेत नाही तोपर्यंत तुम्ही आदर्श राजा होऊ शकत नाही हे आजच्या नेते, पुढाऱ्यांनी लक्षात घ्यायला हवे. छत्रपती शाहू महाराजांनी नेहमी प्रजेचाच विचार केला. आरक्षणाची घोषणा केली. संगीत, शिक्षण क्षेत्रात योगदान दिले. पंजाबराव देशमुख, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाहूंची प्रेरणा घेत मोठ्या शिक्षण संस्था उभ्या केल्या. प्रजेसाठी दुष्काळात अन्नधान्याची सोय करुन रयतेचं राज्य चालवलं. अनेक पैलवान घडविले आजही कुस्त्यांचे शहर करवीर ची नोंद आहे. होस्टेल उभारुन राहण्याचा प्रश्न मिटविला. पाण्याचा प्रश्न मिटविण्यासाठी भूकंप विरहित राधानगरी धरण बांधले. प्लेगची साथ असताना उत्तम आरोग्य सेवा दिली. या साथीच्या काळात उंदीर मारण्याच्या नावाने काही विघ्नसंतोषींनी लूटमार करण्याचे काम केले. अशांचा शोध घेऊन शासन केले. यातूनच चौथे वेदोक्त प्रकरण घडले. अनेक कटू प्रसंगांना सामोरे जावे लागले. अस्पृश्य मातंग समाजात मिसळून भोजन केले. मुंबईत जाऊन प्रत्यक्ष बाबासाहेब आंबेडकर यांचा यशाबद्दल सत्कार केला व सोबत भोजन केले. कोल्हापूर येथे आणून बाबासाहेब आंबेडकर यांची हत्तीवरुन मिरवणूक काढून गौरव केलाच शिवाय पुढील शिक्षणासाठी अर्थसहाय्य केले. छत्रपती शाहूंच्या समोर मृत्यू दिसत असताना मुलगा राजाराम कडून घेतलेली वचने उलगडून सांगितली. प्रजेच्या भल्यासाठी असलेल्या चांगल्या गोष्टी जनतेला माहिती होऊ न देता विपर्यास केला गेला. त्याबाबत अनेक पुरावे उपलब्ध असल्याने प्रत्येकाने खरे शाहू महाराज समजून घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रेमराज पवार यांनी तर दयाराम पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमास सौ. वैशाली शेवाळे, सौ. नूतन पाटील, राहुल निकम, संजय सूर्यवंशी, संदीप खैरनार, दत्तात्रय सोनवणे, डी.एम.पाटील, वाय.बी.पाटील, आर.बी.पाटील, गणेश देवरे, अशोक पाटील, विजय बोरसे, सुनिल वाघमारे, प्रविण पाटील, विद्यार्थी वक्ते आदी उपस्थित होते.