नांदेड जिल्ह्यातील आंबेडकर वादी विचार पेरणाऱ्या अक्षय भालेराव हत्या प्रकरणाचा केला तिव्र निषेध
अमळनेर : येथील मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड, संत गाडगेबाबा प्रबोधन समिती च्या वतीने शिवराज्याभिषेक दिनी मंगळवार, दि.६ जून रोजी मराठी वाड्मय मंडळाच्या नांदेडकर सभागृहात व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात चाळीसगाव येथील पंकज रणदिवे प्रमुख व्याख्याते होते. यावेळी व्यासपीठावर युवा कल्याण प्रतिष्ठान चे अध्यक्ष प्रा. अशोक पवार, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष रामेश्वर भदाणे, संत गाडगेबाबा प्रबोधन समिती च्या सौ. वैशाली शेवाळे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते आई जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करुन जिजाऊ वंदना म्हटली. अजिंक्य चिखलोदकर याने प्रमुख व्याख्याते पंकज रणदिवे यांचा परिचय करुन दिला. आयोजकांनी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले.
मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष रामेश्वर भदाणे यांनी प्रास्ताविकातून वर्षभर समाजसुधारक यांचे विचारांचा जागर कार्यक्रम होणार असून यासाठी युवा प्रतिष्ठान चे सहकार्य राहील असे सांगितले. एकीकडे विचार प्रबोधन अभियानांतर्गत अनेक जण पुढे येत असताना कमी उपस्थिती असते अशी खंतही व्यक्त केली.
माणसाला माणूस म्हणण्याची चळवळ करणाऱ्या थोरांना वंदन करुन पंकज रणदिवे यांनी नांदेड जिल्ह्यात आंबेडकर वादी विचार पेरणाऱ्या अक्षय भालेराव हत्या प्रकरणाचा तिव्र शब्दात जाहीर निषेध व्यक्त केला. त्रिशतकोत्सव राज्यभिषेक होत असताना आकड्यांचे गणित लक्षात घ्यायला हवे. शिवराज्याभिषेक दिन ३४९ वा असताना ३५० वा तसेच हिंदू साम्राज्य दिन असा उल्लेख करुन दिशाभूल केली जात आहे. चूकीचे विचार पेरुन बहुजनांमध्ये भांडणे लावण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचे स्पष्ट केले. जातीयवाद व धर्मवाद सुरु आहे. छत्रपती शिवाजी राजेंना डोक्यात नव्हे डोक्यावर घेतले जाते. यामुळे काय पेरणार व काय उगवणार याचे भान सर्वांनाच असायला हवे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदूच नव्हे तर इतर विविध समाजाला एकत्र सामावून घेत स्वराज्य निर्माण केले. त्याला हिंदू नव्हे तर “हिंदवी स्वराज्य” नाव दिले. लोक कल्याणकारी राज्याची संकल्पना छत्रपती शिवाजी राजांची होती, हिंदू राष्ट्राची नव्हती. यामुळे हिंदू साम्राज्य दिन संबोधणे चूकीचे असून तो “हिंदू स्वाभिमान दिन” संबोधावा असेही स्पष्ट केले. गायकवाड अहवालानुसार २५ टक्के पेक्षा जास्त मराठा भूमीहीन असल्याचा दाखला दिला. अनिष्ट प्रथा, बुवाबाजी, श्रद्धा आणि अंधश्रद्धा भेद करता आला पाहिजे. छत्रपती राजांनी ते भान जपले अंधश्रद्धा पाळली नाही. असा मौलिक संदेश त्यांनी दिला. शेवटी जातीव्यवस्था वर आधारित कविता सादर केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रेमराज पवार यांनी तर अशोक पाटील यांनी आभार मानले.