जिल्हा परिषद शाळा ‘विज्ञान जागृती अभियान’ उपक्रमाचा गडखांब येथे शुभारंभ

अमळनेर : तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी विश्वासराव पाटील यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली शिक्षण विभाग पंचायत समिती अमळनेर व मिल के चलो असोसिएशन यांचे संयुक्त विद्यमाने जि.प.शाळांतील विद्यार्थ्यांना दर्जेदार विज्ञान शिक्षण मिळावे या प्रमुख उद्देशाने पदवीधर शिक्षकांसाठी २०२३-२४ या शैक्षणिक वर्षातील ‘विज्ञान जागृती’ अभियानाची पहिली कार्यशाळा जि.प.केंद्र शाळा, गडखांब येथे नुकतीच संपन्न झाली.

मिल के चलो असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष अनिरुद्ध पाटील व सहकारी विनायक पाटील, कल्याणी पाटील, चेतन वैराळे, वैष्णवी पाटील, शिक्षक समन्वयक दत्तात्रय सोनवणे व गडखांब शाळेच्या मुख्याध्यापिका प्रतिभा बोरसे यांच्या प्रमुख उपस्थितीत नाविन्यपुर्ण विज्ञान प्रयोगशाळेतील प्रयोग क्रमांक १०० – हवेचे गुणधर्म, प्रयोग क्रमांक १०१ – हवेचा जॅक व प्रयोग क्रमांक १०९ – बलून कार या प्रयोगांचे प्रात्यक्षिकासह गटागटातून सादरीकरण करण्यात आले. नाविन्यपुर्ण प्रयोगशाळेतील उपकरणा व्यतिरिक्त परिसरात सहज व अल्पखर्चात उपलब्ध साहित्यातून सदरचे प्रयोग मुलांना आनंददायी व कृतियुक्त पध्दतीने कसे शिकवता येतील ? याबाबत मिल के चलो असोसिएशन चे अनिरुध्द पाटील व प्रा.विनायक पाटील यांनी सखोल मार्गदर्शन करुन “विज्ञान जागृती” अभियानाचा खेळीमेळीच्या वातावरणात शुभारंभ केला.

कार्यशाळेस तालुक्यातील उच्च प्राथमिक शाळेतील छाया पाटील (गडखांब), दत्तात्रय सोनवणे (पिंगळवाडे), कल्पना साळुंखे (देवगाव देवळी), विलास मोरे (खडके), इसहाक मावची (चिमणपुरी), हेमंत शिंदे (निंभोरा), लिना पाटील (पळासदडे), राजेंद्र सैंदाणे (नगाव बु.), सुनिल मोरे (सडावण), राजेंद्र चौधरी (कावपिंप्री), किरण बाविस्कर (जैतपिर), संजय जगताप (सुंदरपट्टी), हिंमत चौधरी (खवशी), जावीद हुसेन (सारबेटे उर्दू), भिमराव वरोळे (टाकरखेडे) आदी शिक्षक उपस्थित होते.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!