परवाचीच गोष्ट आहे. मी एका दुकानात मित्रासोबत गप्पा मारत बसलो होतो. उकाडा होत असताना आकाशात ढग दाटून आले आणि बघता बघता जोरदार पावसाला सुरुवात झाली. दुकाना समोरच ‘राजगड प्लाझा’ नावाची इमारत होती. पाहतो तर काय.. एक कुत्रा कंपाऊंडच्या आत असलेल्या पार्किंग मध्ये उभ्या असलेल्या कारच्या टपावर जाऊन ऐटीत बसलेला होता. रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या कडे तो निरखून पाहत होता. आपल्या मालकाला व त्यांच्या घराला सुरक्षित ठेवता यावे याची पुरेपूर काळजी त्या मुक्या प्राण्याने घेतलेली दिसत होती. जणू ते सांगत असावे की… “आम्ही भाकरीला जागतो. इतकेच नव्हे तर एखाद्या अंध, अपंग गरजू माणसाला आधार देखील देत असतो.” हे सारं मनाला भावलं आणि मोबाईल मध्ये तो क्षण टिपला.
मुके प्राणी अनेक मार्गांनी मानवाचे कल्याण करतात. मुके प्राणी पाळणाऱ्या व्यक्तीला हे सांगण्याची आवश्यकता नाही. कुत्र्यांची नैसर्गिक प्रवृत्ती बहुतेकदा ज्या कोणी पाळले असेल त्यांच्या घराचे आणि कुटुंबाचे रक्षण करण्याची असते. जेव्हा मेलमॅन दारात येतो तेव्हा त्रासदायक ठरू शकते परंतु कोणीतरी अधिक वाईट व्यक्ती आजूबाजूला आल्यास उपयुक्त ठरते. श्रवण आणि वासाच्या तीव्र संवेदनांसह, कुत्रे आपण करू शकत नसलेल्या गोष्टी शोधू शकतात आणि संभाव्य धोक्याची सूचना देऊ शकतात.
हल्लीची असंख्य माणसं जीवंत असूनही मेल्यासारखीच आहेत. खऱ्याखुऱ्या माणसाला यातना देणारी ही माणसं. भाऊ भावाचा, पुत्र पित्याचा वैरी बनलाय. राजकारणावर तर बोलायलाच नको. हे लोक स्वार्थासाठी काय करतील याचा नेम नाही. निवडणुकीत पक्षाच्या चिन्हावर व जनतेच्या जीवावर निवडून यायचे आणि काम झाले की, त्याच पक्षाकडे व जनतेकडे पाठ फिरवायची अशी यांची निती आहे. पण.. आम्ही मुके प्राणी असलो तरी आमची नितीमत्ता शाबूत आहे. यामुळेच तर “आम्ही भाकरीला जागतो.”
……. संजय सूर्यवंशी, संपादक दिव्यचक्र.