साहित्य संमेलन पूर्वतयारी प्राथमिक बैठकीत सूचनांचा पाढा ; खानदेशातील ३० टक्के साहित्यिकांना संधी देण्यासाठी प्रयत्न
अमळनेर : सध्या साहित्य संमेलनाचे रुप, पध्दती, विचार बदलत असून त्या अनुषंगाने खानदेशातील ३० टक्के साहित्यिकांना संधी देण्यासाठी प्रयत्नशील आहोत असे मराठी वाड्मय मंडळाचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी यांनी सांगितले. येथील जी. एस. हायस्कूल च्या आय. एम. ए सभागृहात दिनांक २ ते ४ फेब्रुवारी २०२४ मध्ये होऊ घातलेल्या ९७ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या पूर्वतयारीसाठी प्राथमिक बैठक नुकतीच पार पडली. यावेळी ते बोलत होते. विचार मंचावर पदाधिकारी श्यामकांत भदाणे, रमेश पवार, नरेंद्र निकुंभ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद सोनवणे यांनी केले.
डॉ. अविनाश जोशी पुढे म्हणाले की, सूचना करणे सोपे असते पण.. जबाबदारी पार पाडणे हे अवघड काम असते. हाती घेतलेले हे काम पूर्ण साहित्य संमेलनासाठी खानदेश ला मिळालेला बहुमान अधिक उंचीवर नेण्यासाठी सर्वांचेच सहकार्य अपेक्षित आहे. साधारणपणे साडे तीन ते चार हजार लोकांना राहण्यासाठी हॉटेल, मंगल कार्यालयात व्यवस्था करण्यात आली आहे. शहरातील तीनही रस्त्यावर प्रवेश करतांना स्वागत कमानी उभारुन तेथे स्वयंसेवक असणार आहेत. येणाऱ्या साहित्य प्रेमींना स्वयंसेवक माहिती देतील. माध्यम समूहाचे वतीने पत्रकार राजू महाले यांनी साहित्य संमेलनासाठी आमचे सहकार्य राहील. जे काही योग्य असेल ते जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे सांगितले.
प्रताप महाविद्यालयाचे माजी प्राचार्य एल. ए. पाटील म्हणाले की, कार्यक्रमाची दिशाच माहीत नसेल तर सूचना काय करणार ? असा प्रश्न उपस्थित करीत साहित्य लिखाणात समाजाच्या हिताचं लिहिलं जावं, लिखाणात गुणवत्ता असावी. वस्तुनिष्ठ मांडणी असावी. साहित्याचा इतरांना त्रास होऊ नये अशा सूचना केल्या. यासोबतच साहित्य संमेलनासाठी आर्थिक मदत म्हणून २१ हजार रुपये देणगी जाहीर केली. प्रताप महाविद्यालयाचे मराठी विभागप्रमुख प्रा. रमेश माने यांनी अखिल भारतीय साहित्य संमेलनासाठी खानदेशातील साहित्यिक दिसत नाहीत का ? असे सांगत परिसरातील अहिराणी कवी कृष्णा पाटील, ग. दा. कुडे, वा. रा. सोनार अशा दिवंगत कवींची नावे सभामंडपाला द्यायला हवीत असा मुद्दा मांडला.
सानेगुरुजी कर्मभूमी स्मारक च्या कार्यवाह दर्शना पवार म्हणाल्या की, संमेलन काळात जे जे शक्य होईल ती जबाबदारी स्मारक समितीचे कार्यकर्ते पार पाडतील. साहित्य संमेलनाचा आनंद घेता यावा यासाठी स्त्रियांवर ओझं लादू नये. साहित्य संमेलनात सानेगुरुजी आणि स्त्रियांचं नातं स्पष्ट करावे अशा सूचना केल्या. प्रा. माधुरी भांडारकर, डॉ. अपर्णा मुठे, डॉ. कुणाल पवार , हरिष कंखरे, डॉ. प्र. ज. जोशी, उद्योजक बजरंगशेठ अग्रवाल, मनिष करंजे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. साहित्य संमेलन यशस्वीतेसाठी एकदिलाने आपले काम करु अशी ग्वाही दिली.