‘थोरांची ओळख’ उपक्रमाचे उद्घाटन
अमळनेर : जागतिक लोकसंख्या दिनाचे औचित्य साधत खोकरपाट, ता. अमळनेर येथे जि.प.प्राथमिक शाळेत शैक्षणिक वर्ष २०२३ मध्ये इ.१ ते ५ वर्गांसाठी ‘थोरांची ओळख’ या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. भैय्यासाहेब रमेश साळुंखे यांच्या संकल्पनेतून सुरु झालेल्या सदर उपक्रमाचे उद्घाटन शालेय पोषण आहार सेविका (आक्का) यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या उपक्रमात सहभागी विद्यार्थी थोर पुरुषांची माहिती सादरीकरण करतील आणि सोबत थोर पुरुषांची चित्रं देखील रंगवतील असे या उपक्रमाचे स्वरूप सांगता येईल.
उद्घाटन प्रसंगी कु. कार्तिकी हेमराज पाटील इ.५वी ( विद्यमान मुख्यमंत्री, शाळा खोकरपाट ) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पैलूंवर प्रकाश टाकला. कु. कार्तिकी म्हणाली की, महाराजांनी मराठी भाषा शुद्धीकरण व मराठी भाषा शब्दकोश तयार करण्याचे काम सुरू केले. राजा व त्याचे मंत्रिमंडळ हे रयतेचे सेवक आहेत हे जगात प्रथम शिवरायांनी मांडले आणि अंमलात आणले ! धर्म हा रयतेसाठी आहे ..रयत धर्मासाठी नाही ! राजा हा कोणत्याही धर्माचाऱ्यांपेक्षा श्रेष्ठ आहे ! रयतेचे शोषण करणारी धर्म व्यवस्था नाकारण्याचा पूर्ण अधिकार रयतेला आहे. हे छत्रपती शिवाजी महाराज यांनी दाखवून दिले.