अमळनेर येथे सानेगुरुजींच्या कर्मभूमीत १८ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन संपन्न होणार; पत्रकार परिषदेत घोषणा

सरकारी निधी न घेता तालुक्यासह खानदेशातील जनतेच्या सहकार्यातून आणि श्रमातून आकार घेणार हे संमेलन

अमळनेर : सर्वसामान्य शेतकरी,श्रमिक, महिला, दलित, आदिवासी, इतर मागास अशा एकूणच बहुजन समाजाच्या साहित्यिक आणि सांस्कृतिक अभिव्यक्तीला मुक्त विचारपीठ उपलब्ध करून देणारे १८ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन अमळनेर शहरात दिनांक ०३ व ०४ फेब्रुवारी २०२४ रोजी संपन्न होणार असल्याची घोषणा विद्रोही साहित्य व सांस्कृतिक परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी धनदाई महाविद्यालयाच्या यशवंत सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत केली.

भारतीय संविधानिक मूल्यांचा पुरस्कार करणारे तसेच सामान्य जनतेच्या प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवून होणारे हे संमेलन कुठलाही सरकारी निधी न घेता अमळनेर तालुक्यासह संपूर्ण खानदेशातील जनतेच्या सहकार्यातून आणि श्रमातून आकार घेणार असून साने गुरुजींच्या ‘खरा तो एकचि धर्म,जगाला प्रेम अर्पावे’ या प्रार्थनेतील विचारानुसार सदर संमेलन सामाजिक सौहार्द, बंधुभाव, सहकार्य यास समर्पित असेल. हे विद्रोही संमेलनाचे वैशिष्ट्य असणार आहे. प्रस्थापित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या लिंग-जात-वर्ग वर्चस्ववादी साहित्य व्यवहारांना, सरकारी पैशांवर होणाऱ्या उधळपट्टीला, समाजाच्या वास्तव प्रश्नांकडे दुर्लक्ष करून समाजात होत असणाऱ्या विषमतावादी व सामाजिक न्याय डावलणाऱ्या घटनांवर ‘ब्र’ शब्द न काढता चंगळवादी संस्कृतीचा पुरस्कार करत मनोरंजन प्रधान स्वरूपाला आमचा विरोध असून हा विरोध महात्मा ज्योतिराव फुले यांनी ग्रंथकार सभेस पाठवलेल्या पत्रावर आधारित आहे. हे पत्र हाच विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचा जाहीरनामा आहे. अमळनेरची भूमी ही पुरोगामी विचारांचा वारसा सांगणारी भूमी आहे. या तालुक्यातील अनेक गावे महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विचारांनी भारावलेले होते. साने गुरुजीं सारखे शेतकरी व कष्टकऱ्यांची भावना आपल्या साहित्यातून मांडणारे व कामगारांची आंदोलने उभी करणारे लेखक या भूमीत होऊन गेले. क्रांतिसिंह उत्तमराव पाटील, क्रांतीविरांगणा लिलाताई पाटील यांची ही क्रांती भूमी आहे. शाहीर साबळेंसारख्या महाराष्ट्र शाहिरांची जडणघडण या मातीत झालेली आहे. हा वारसा आपल्या जीवनात घेऊन वावरणारे अमळनेरवासी हे १८ वे विद्रोही साहित्य संमेलन मोठ्या प्रमाणावर यशस्वी करतील याची आम्हास खात्री आहे. असे विद्रोही साहित्य व सांस्कृतिक परिषद महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्षा प्रा. प्रतिमा परदेशी यांनी यावेळी सांगितले.

१८ व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे निमित्ताने अमळनेरकरांना सांस्कृतिक मिरवणूक, कवी कट्टा, गझल कट्टा, शाहिरी काव्य यासह कथा, कादंबरी वैचारिक साहित्य, कला व सांस्कृतिक प्रदर्शन अशा विविध साहित्यिक उपक्रमांची मेजवानी वाचकांना व रसिकांना उपलब्ध होणार असल्याचे सांगतानाच महात्मा फुले, राजश्री शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संयुक्त महाराष्ट्राचे सेनानी अण्णाभाऊ साठे, शाहीर गव्हाणकर, शाहीर अमर शेख, महाकवी वामनदादा कर्डक, क्रांतिसिंह नाना पाटील, भाई उद्धवराव पाटील, कर्मवीर दादासाहेब गायकवाड, शाहीर यशवंत चकोर यासारख्या अनेक प्रतिभावान साहित्यिकांना अखिल भारतीय साहित्य संमेलनांनी साहित्यिक मानले नाही. या उलट विद्रोही साहित्य संमेलन हे अत्यंत जोरकसपणे बहुजनवादी विचार व्यक्त करत आलेले आहेत असे राज्य संघटक किशोर ढमाले यांनी सांगितले.

महान साहित्यिक बाबुराव बागुल, आदिवासी साहित्यिक वाहरू सोनवणे, डॉ. यशवंत मनोहर, अजिज नदाफ, आत्माराम राठोड, कॉ. तारा रेड्डी, तुळशी परब, डॉ. आ. ह. साळुंखे, उर्मिला पवार, संजय पवार, जयंत पवार, डॉ. श्रीराम गुंदेकर, विमल मोरे, डॉ. प्रतिभा अहिरे, चंद्रकांत वानखेडे यासारख्या अनेक दिग्गज साहित्यिकांनी विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद आजवर भूषवले असल्याचे प्रास्ताविकात प्रा. डॉ. लिलाधर पाटील यांनी सांगितले. श्रमिक, कष्टकरी बहुजनांच्या जीवनातील वास्तवाचा जिवंत साहित्य प्रवाह अमळनेर करांच्या अनुभवास आणण्याची जबाबदारी सामाजिक चळवळीतील वारकरी म्हणून आम्ही स्विकारली आहे. अमळनेर कर विद्रोही साहित्य संमेलनाचे जोरदार स्वागत करण्यासाठी सज्ज आहेत असे सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे यांनी आभार मानतांना सांगितले. याप्रसंगी विचार मंचावर युवा कल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.अशोक पवार,जेष्ठ विद्रोही साहित्य व सांस्कृ्तिक परिषदेचे मंसाराम पवार, एल. जे. गावीत, नगरसेवक घनश्याम पाटील आदी उपस्थित होते.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!