जानवे येथे साने गुरुजी सार्वजनिक वाचनालय तर्फे गुणगौरव सोहळा संपन्न

नेहमीच उघड्या डोळ्यांनी मी जे स्वप्न पाहत होते, तेच स्वप्न प्रत्यक्षात समोर साकारले : कु. दामिनी पाटील

अमळनेर : मी एक शेतकरी बापाची कन्या व देशाचे रक्षण करणाऱ्या जवानाची बहीण असून नेहमीच उघड्या डोळ्यांनी मी जे स्वप्न पाहत होते, तेच स्वप्न प्रत्यक्षात समोर साकारले. यासाठी शिक्षकांचे मार्गदर्शन व कुटुंबातील सर्वांची साथ मिळाल्याने यशस्वी झाल्याचे मत MPSC तर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन ‘मंत्रालय लिपिक’ पदी निवड झालेल्या कु. दामिनी ने व्यक्त केले. तालुक्यातील जानवे येथील प्रगतिशील शेतकरी श्री अनिल मधुकर पाटील (भैय्यासाहेब) यांची ती कन्या आहे. साने गुरुजी सार्वजनिक वाचनालय, जानवे तर्फे आई भवानी मंदीराचे आवारात आयोजित गुणगौरव सोहळा कार्यक्रमात सत्कार प्रसंगी ती बोलत होती. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी युवा कल्याण प्रतिष्ठान चे अध्यक्ष प्रा. अशोक पवार होते. प्रमुख पाहुणे म्हणून खानदेश शिक्षण मंडळाचे चेअरमन डॉ. अनिल शिंदे, मौर्य क्रांती सेना महाराष्ट्र उपाध्यक्ष बन्सीलाल भागवत गुरुजी, जानवे गावच्या लोकनियुक्त सरपंच सरलाताई प्रकाश पाटील, यमुनाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा पत्रकार संजय सूर्यवंशी, साने गुरुजी सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष डी. एम. पाटील सर, उपसरपंच गोपाल भाऊ, वकील बाबा, शिवश्री भास्कर नानाजी पाटील, मुख्याध्यापक देशमुख सर, उमेश मनोरे यांचेसह सन्मानार्थी कु. दामिनी पाटील आदी उपस्थित होते.

मनोगत व्यक्त करताना कु. दामिनी पाटील

सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते पुज्य सानेगुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजक डी. एम. पाटील सर यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमा बाबत भूमिका विशद केली. आयोजकांतर्फे आलेल्या मान्यवरांचा शाल, बुके देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी जानवे गावची कन्या कु. दामिनी अनिल पाटील हिची मंत्रालयात लिपिक पदी निवड झाल्याबद्दल तसेच दहावी, बारावी परीक्षेत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.

आर्थिक वा राजकीय शक्ती पुढे ‘माहिती व ज्ञान शक्ती’ मोठी : प्रा. अशोक पवार

अध्यक्षीय स्थानावरुन बोलताना प्रा. अशोक पवार म्हणाले की, गुणवत्ता ही जाती धर्मावर, परिस्थिती वर अवलंबून नसते तर गुणवत्ता सिद्ध करावी लागते. आर्थिक, राजकीय शक्ती पुढे माहिती व ज्ञान शक्ती मोठी असते. राजकीय दृष्ट्या शिक्षण हा संशोधनाचा विषय आहे. दुसऱ्याचं यश काही लोकांना खुपतं. आजघडीला अनेकांना आर्थिक परिस्थिती सांगायलाही लाज वाटते. परिस्थितीची लाज न बाळगता स्वत:ला सिध्द करा, अभ्यासात जीव ओता असा सल्ला देत पाच विद्यार्थी दत्तक घेणार असल्याचे घोषित केले. कु. दामिनी च्या नेतृत्वाखाली जानवे विकास मंच स्थापन करावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

बन्सीलाल भागवत गुरुजी म्हणाले की, प्रगती करायची असेल तर वाचनालये असायला हवीत.. मंदिरे नको.  शिक्षणा शिवाय क्रांती होऊ शकत नाही. गावकऱ्यांनी केलेला सत्कार महत्वाचा असतो. जन्माने कोणी विद्वान नसतो तर त्या व्यक्तीला त्याचे कर्तृत्व मोठं बनविते. डॉ. अनिल शिंदे म्हणाले की, मुले घडविण्यात गुरुजींचा रोल महत्वाचा असतो. पाठीवर दिलेल्या थापेने समोरच्याला प्रेरणा मिळत असते. खानदेश शिक्षण मंडळाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. गरीब होतकरू विद्यार्थ्यांना साथ देऊ. शिक्षकांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक उमेश मनोरे यांनी तर आभारप्रदर्शन आयोजक डी. एम. पाटील सर यांनी केले. यावेळी जानवे गावातील ग्रामपंचायत, विविध कार्यकारी सोसायटी, अन्य संस्थांचे पदाधिकारी, शिक्षकवृंद, ग्रामस्थ, विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!