अमळनेरच्या छत्रपती शिवाजी नाट्यगृहात हाऊसफुल्ल गर्दीत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उपस्थितांना दिले मौलिक विचारांचे धडे

शेताचा बांध, थोर विचारवंत, शाळेची खोली हीच आपली खरी मंदिरे : आयकर आयुक्त संदीपकुमार साळुंखे

अमळनेर : कोणतेही यश हे सहजासहजी मिळत नाही. शिक्षणाने माणूस घडतो हेच खरे. सर्वत्र मंदिरांचा बाजार झाला असून खरी मंदिरे जपली पाहिजेत. शेताचा बांध, थोर विचारवंत, शाळेची खोली हीच आपली मंदिरे आहेत असे मत आयकर आयुक्त संदीपकुमार साळुंखे यांनी व्यक्त केले. येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात उत्कर्ष खान्देशी अधिकारी व तालुक्यातील विविध विकास मंचातर्फे झालेल्या ‘कर्तृत्वाचा महासन्मान’ कार्यक्रमात ते मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी नाट्यगृह हाऊसफुल्ल गर्दीने खचाखच भरलेले होते. सोबत व्यासपीठावर मुंबई सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक राजेश पाटील, नाशिक जीएसटी विभागाचे उपायुक्त मधुकर पाटील, पोलीस उपअधीक्षक सुनील नंदवाळकर, पोलीस निरीक्षक विजय शिंदे, सा. बां. विभागाचे उपविभागीय अभियंता विजय भदाणे, खा. शि. मंडळाचे माजी कार्याध्यक्ष बजरंगलाल अग्रवाल, खा. शि. मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल शिंदे,  प्रताप महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य डॉ. एस. आर. चौधरी, निवृत्त उपप्राचार्य डॉ. एस. ओ. माळी, मराठी वाड्मय मंडळाचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी उपस्थित होते.

संदीपकुमार साळुंखे पुढे म्हणाले की, तरुणांनी स्वतः:ला आवड असलेल्या क्षेत्रात झोकून दिल्यास अपेक्षित यश मिळते. अधिकारी बनायचे तर समाजाच्या हितासाठी बना. काम करताना भावना महत्त्वाची असते. ती भावना मनात, हृदयात असायला हवी. आपण ईश्वराचेच काम करतो आहोत याची जाण ठेवावी. माणसाचा हिशोब ठेऊ नका. यावेळी मान्यवरांच्या हस्ते स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण झालेले डॉ. घनश्याम पाटील (फ्लाईंग ऑफिसर), ऋतुजा पाटील (मुख्याधिकारी), प्रसाद चौधरी (सहायक आयुक्त राज्यकर), रोहित पवार (सहाय्यक अभियंता वर्ग-2), राहुल पारधी, नेहा पाटील, विवेक सोनवणे (विक्रीकर निरीक्षक), सागर पटेल (पशुधन विकास अधिकारी), रामदास चव्हाण (विकास अधिकारी),  हर्षदा देसले (कृषीच्या डेप्युटी डायरेक्टर), माधुरी पाटील (पीएसआय), जयवंतराव येशीराव (पीएसआय), घनश्याम काटे (पोलीस) यांच्यासह विविध पदांवर नियुक्त  झालेले खान्देशातील सुमारे ७५ कर्तृत्ववान तरुण-तरुणींचा सन्मान करण्यात आला. राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या कार्यक्रमांची नोंद घेऊन युवा कल्याण प्रतिष्ठान चे अध्यक्ष प्रा अशोक पवार यांनाही सन्मानित करण्यात आले. याचप्रमाणे NEET परिक्षेत जळगाव जिल्ह्यात सर्वप्रथम आलेल्या कु. भूमी रंगराव पाटील हिचादेखील सन्मान करण्यात आला. तालुक्यात वाचन संस्कृती वाढावी या पार्श्वभूमीवर स्वर्गीय महेश पन्नालाल थोरात यांच्या स्मृती प्रित्यर्थ वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैयालाल थोरात (मुंबई) यांच्यातर्फे “फिरते वाचनालय” चा शुभारंभ करून प्रातिनिधिक स्वरूपात दहा गावांना पुस्तकांनी भरलेल्या बॅगा वितरीत करण्यात आल्या. तसेच सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातर्फे ‘चला व्यक्तिमत्व विकास घडवूया’ या उपक्रमाचे उद्घाटनही मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. डॉ. शरद बाविस्कर यांनी स्वतः तयार केलेले आयुक्त संदीपकुमार साळुंखे व आयएएस राजेश पाटील यांचे स्केच मान्यवर अधिकारी यांना देण्यात आले.

आयएएस राजेश पाटील म्हणाले की, इतिहासाची पाने चाळली तर यश निश्चितच मिळतं. थोर समाजसुधारक  यांची जीवनमूल्ये समजून घेणे आवश्यक. परिक्षा पास होऊन नोकरी करणे ठीक मात्र देश व समाजासाठी काम करणं हे मोठं आव्हान आहे. जीवनाचा उद्देश निश्चित असावा. संपत्ती पेक्षा जीवनाचं तत्त्वज्ञान वाढवावं. नैतिकता सोबत वागणूक चांगली असावी. विकृतीना दूर ठेवा. ज्ञान असेल तर महत्व प्राप्त होते. माणूसकी अनंत काळ टिकते. तुकाराम महाराज अग्रणी क्रांतिकारक असल्याचे त्यांनी सांगितले. शेवटी शरीरसंपत्ती महत्वाची असते यासाठी आरोग्यावर लक्ष द्या असा उपदेश केला. सन्मानार्थी ऋतुजा पाटील, प्रसाद चौधरी, जयवंत राव येशीराव यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. उत्कर्ष खानदेशी अधिकारी ग्रुप चे समन्वयक तथा नागपूर प्राधिकरणाचे उपसंचालक कपिल पवार यांनी प्रास्ताविक केले. युनियन बँकेचे वरिष्ठ प्रबंधक मयूर पाटील व उमेश काटे सूत्रसंचालन केले. डी ए धनगर यांनी आभार मानले. तालुक्यातील उत्कर्ष खान्देशी अधिकारी व तालुक्यातील विविध विकास मंचच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!