ॲड. ललिताताई पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य शेतकरी मार्गदर्शन मेळावा संपन्न
अमळनेर : येथील जिजाऊ बहुउद्देशीय संस्था व फिनिक्स सोशल अवेरनेस ग्रुप तर्फे ॲड. ललिताताई पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त काल दि. २६ जुलै रोजी गलवाडे रोडवरील अंबिका मंगल कार्यालयात भव्य ‘शेतकरी मार्गदर्शन मेळावा’ पार पडला. कार्यक्रमास मार्गदर्शक म्हणून सुप्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख उपस्थित होते. व्यासपीठावर प्रा. शिवाजीराव पाटील, प्रा. श्याम पाटील, संचालक पराग पाटील, मराठा समाजाचे जयवंत पाटील, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष गोकुळ आबा, पोलीस निरीक्षक विजय शिंदे, पंचायत समितीचे माजी सभापती श्याम अहिरे धनगर पाटील, व्ही. आर. पाटील आदी उपस्थित होते.
सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते बळीराजा व सरस्वती प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. बळीराजा प्रतिमेजवळ जगाच्या पोशिंद्याने पिकवलेलं सप्तधान्य ठेवण्यात आले होते. आयोजकांतर्फे मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन सौ. वसुंधरा लांडगे यांनी केले. सौ. भारती पाटील यांनी आभार मानले.
आपल्या मनोगतात ॲड. ललिता पाटील म्हणाल्या की, मिडियामध्ये ब्रेकिंग न्यूज कसली येते ?.. माझा शेतकरी उपेक्षित असताना त्यावर ब्रेकींग न्युज असायला हवी. आपला मुलगा नोकरीत असावा असे साऱ्यांनाच वाटते पण.. शेतकरी मुलगा असावा असे कोणासही वाटत नाही ही शोकांतिका आहे. आपला देश जगाचा पोशिंदा बळीराजा चे जीवावर चालतो हे कोरोना काळात सर्वांनीच अनुभवले आहे. बॅंकेवर शेतकरी प्रतिनिधी असावा, शेतकऱ्यांचे सिविल चेक करणाऱ्या बॅंकेवर गुन्हा दाखल व्हावा. पिकविमा भरायला ग्रामीण भागातील लोक शहरात न येता चावडीवर जाऊन पिकविमा भरायला पाहिजे यामुळे शेतकऱ्याचा वेळ, श्रम, पैसा वाचेल असेही सूचित केले. उताऱ्यावरील कर्ज बोजा कमी करायला अनेक अडचणी निर्माण करुन वेळ जातो. कर्ज बोजा मुळे शेतकरी आत्महत्या होत आहेत. सत्ता नको पण पाणी द्या म्हणणारा आमका राजकीय पुढारी नाही. पाडळसरे धरण पूर्ण होत नाही म्हणून राजीनामा देण्याचं धाडस कोणी केलं नाही. राजकारण्यांनी दिलेली आश्वासने पूर्ण केले नाही अशा शेतकऱ्यांशी निगडित मुद्द्यांवर त्यांनी प्रकाश टाकला. शेवटी ‘मला शेतकरी व्हायचंय…’ ही कविता सादर केली.
हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी पावसाचा अंदाज सांगत व्यक्त होण्यास सुरुवात केली. अवकाळी पाऊस व नेहमीचा पाऊस कसा बरसणार ? याचा वेध घेतला. पूर्वेकडून पाऊस आल्याने महाराष्ट्रात भरपूर पाऊस. झाडे लाऊन पृथ्वीचं तापमान कमी करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत अशी माफक अपेक्षाही व्यक्त केली. शेतकरी बांधवांचे नुकसान वाचविण्यासाठी महाराष्ट्र भर व्हाटस्अप ग्रुप तयार करुन तसा अंदाज कळविला जात असल्याचे सांगितले. सायंकाळचा सूर्य पिवळा, लाईटवर किडे, विमानाचा आवाज आला, लाऊडस्पिकर चा आवाज बाजूच्या दुसऱ्या गावाला पोहचला, चिमण्या धुळीत आंघोळ करताहेत तर साधारण तीन दिवसांत पाऊस पडतोच. प्राणी देखील आपणास पाऊसाची पूर्वसूचना देत असतात. बिब्याच्या झाडाला जास्त फुले आल्यावर दुष्काळ पडतो. पाऊसापासून कसे सुरक्षित राहता येईल ? याबाबत देखील त्यांनी काय करावे व काय करु नये याबाबत माहिती दिली. एखाद्या ज्योतिषाने भविष्यवाणी सांगावी अशाप्रकारे त्यांनी उपस्थितांना भाराऊन टाकले. यानंतर ॲड. ललिताताई पाटील यांना अनेकांनी रांगेत उभे राहून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. अमळनेर शहर व ग्रामीण परिसरातील अनेक पदाधिकारी, शेतकरी, पत्रकार उपस्थित होते. आयोजकांतर्फे भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.