प्रा. शिवाजीराव पाटील लिखित ‘सत्यशोधक निर्भंगावली’ नव्या युगाचे प्रबोधन या द्विखंडात्मक ग्रंथाचे दिमाखात झाले प्रकाशन.

अमळनेर : स्त्रियांचा इतिहास खूप मोठा आहे. प्रथम शेतकरी ‘स्त्री’ आहे हेच सत्य आहे. लक्ष्मीपूजनला खरे तर धान्य पूजन करावे अशीच पद्धत आहे. मात्र चूकीचा इतिहास सांगितला जातो. इतिहासाचे चूकीचे ज्ञान समाजाला आत्मघाताकडे नेते असे मत प्रतिइतिहासकार शिवश्री चंद्रशेखर शिखरे यांनी व्यक्त केले. अमळनेर येथील सुप्रसिद्ध लेखक व विचारवंत प्रा. शिवाजीराव पाटील लिखित ‘सत्यशोधक निर्भंगावली’ नव्या युगाचे प्रबोधन या द्विखंडात्मक ग्रंथाचा प्रकाशन सोहळा रविवार ३० जुलै रोजी रोटरी हॉल येथे संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते. विचार मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी निवृत्त मुख्याध्यापिका सौ.सुमनताई पाटील, सत्यशोधक वारकरी महासंघाचे अध्यक्ष शास्त्री भगवानदास घुगे, ग्रंथलेखक निर्भंगावलीकार प्रा. शिवाजीराव पाटील उपस्थित होते. याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर व सामाजिक चळवळीतील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
युवा कल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. अशोक पवार यांनी प्रास्ताविकातून गरीब मुक्त झाला पाहिजे हे ध्येय समोर ठेवून प्रा. शिवाजी पाटील यांनी पहिल्या खंडात १६२१ तर दुसऱ्या खंडात ७५० असे एकूण २३७१ निर्भंगाचे लेखन केले आहे. निर्भंगावली खंड १ ची प्रस्तावना प्रा. अं. ह. साळुंखे यांनी तर खंड २ ची प्रस्तावना प्रा. शिवश्री गंगाधर बनबरे यांनी केली आहे. निर्भंगावली खंड २ साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांना अर्पण केल्याचे सांगितले. यानंतर मान्यवरांच्या हस्ते समाजसुधारक आई जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, छत्रपती शाहू, बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सौ. वसुंधरा लांडगे यांनी जिजाऊ वंदना म्हटली. आयोजकांतर्फे मान्यवर व प्रमुख पाहुण्यांचा पुस्तक व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. पुस्तकाचे प्रकाशन शिवश्री चंद्रशेखर शिखरे, शास्त्री भगवानदास घुगे, मा. आ. दिलीप सोनवणे, डॉ. अनिल शिंदे, सौ. तिलोत्तमा पाटील, सौ. ज्योतीताई शिखरे, निर्भंगावलीकार शिवाजीराव पाटील, सौ. सुमनताई पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. शिवराज्याभिषेक सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियानांतर्गत जिजाऊ प्रकाशन, पुणे यांनी हा ग्रंथ उपलब्ध करुन दिला आहे.

शिवश्री चंद्रशेखर शिखरे म्हणाले की, भंग न पावणारा तो अभंग असून प्रबोधन हे कोणत्याही क्रांतीची पूर्व अट असते. प्रबोधन दोन प्रकार चे असून सुप्रबोधन नैतिक असते तर कुप्रबोधन अनैतिक असते. समाजाच्या हितासाठी जे साहित्य तयार होते ते खरे साहित्य. जात धर्म प्रांताचे भेद मिटवून माणसांमध्ये माणुसकी निर्माण करुन सत्य सांगते ती असते निर्भंगावली असे सांगत लेखक शिवाजीराव पाटील यांचे कौतुक केले. मायभाषा कोणतीही असो तिला महत्व द्यायला हवे असते. शब्द माहीत असून उपयोग नाही तर त्याचा अर्थ माहिती असावा. इतिहास सांगताना ताराराणी, उमाबाई दाभाडे, लिलाताई पाटील यांचा खरा प्रवास व बलिदाना विषयी माहिती दिली. यातून सत्य इतिहास कसा दडविला जातो हे लक्षात घेण्याची गरज असल्याचे सांगितले. महात्मा फुले नी ग्रंथकार सभेला लिहिलेल्या पत्राचा उल्लेख करत अ.भा.साहित्य संमेलनात वेदना, व्यथा नाहीत, अध्यक्षपदी कोणाला बसवलं जातं त्याची पात्रता तपासली जात नाही. सरकारी पैशाची उधळपट्टी केली जाते तेथे विचार कोणते असणार ? असा मुद्दा उपस्थित केला.
शास्त्री भगवानदास घुगे म्हणाले की, वाड्मय निर्माण करावे की नाही असा प्रश्न पडतो. कवी, लेखक स्वतःचे अधिकाराने लिखाण करतात ते एक प्रासादीक देणं असतं. काही विकृतांना ते सहन होत नाही. प्रा. शिवाजीराव पाटील यांनी प्रबोधनात्मक, सत्य लेखन करुन निर्मित निर्भंगावली तुकाराम महाराजांच्या गाथेपेक्षा मोठी आहे असे सांगितले. सत्य स्विकारायला मोठी हिंमत लागते. निर्भंगावली नव्या पिढीला उपयुक्त असेल. नारद, परशुराम हे काल्पनिक पात्र होते. ज्ञानेश्वरी शुध्दीकरण करुन एकनाथ महाराजांनी गद्दारी केली. फुले, शाहू, आंबेडकर यांचे आपल्यावर उपकार असल्याचे त्यांनी सांगितले.
लेखक निर्भंगावलीकार शिवाजीराव पाटील यांनी महामानवांनी लिहायला शिकवलं. वाचनातून विचार बदलावे लागतात. सत्य असत्य समजून सत्य सांगितलेच पाहिजे. सामाजिक कार्य करणं सोपं काम नसल्याचे सांगितले. अध्यक्षीय भाषणात सुमनताई पाटील यांनी शिवधर्माची गरज असून आम्ही २००५ ला शिवधर्म स्वीकारल्याचे सांगितले. कार्यक्रमावेळी समाजसुधारक, शेतकरी यावर आधारित दोन निर्भंग झलक चे सादरीकरण अजय भामरे यांनी केले. त्यांना विश्वासराव पाटील, कैलास पाटील, आर. बी. पाटील, कमलाकर संदानशिव, चंदुभाऊ आदींनी संगीतसाथ दिली. सोहळ्यास मोठ्या संख्येने श्रोते उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन प्रा. डॉ. लिलाधर पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी मराठा सेवा संघ, राष्ट्रीय किसान मोर्चा, युवा कल्याण प्रतिष्ठान, सर्व पुरोगामी संघटनांचे सहकार्य लाभले.