आदर्श विद्यालय, अमळगाव येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी

अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा जागर करुन समाजाला विधायक वळण दिल्यास ती फलश्रुती ठरेल : संजय सूर्यवंशी

अमळनेर : मराठी साहित्याला क्रांतीचा उर्जास्त्रोत देणारे लोकशाहीर म्हणून सुपरिचित असलेले साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठें चे नाव महाराष्ट्राच्या यादीत वगळले जाते ही शोकांतिका आहे. अण्णाभाऊंच्या विचारांचा जागर करुन समाजाला विधायक वळण दिल्यास ती फलश्रुती ठरेल असे मत यमुनाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा पत्रकार संजय सूर्यवंशी यांनी व्यक्त केले. ते आदर्श विद्यालय अमळगाव येथे राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियानांतर्गत झालेल्या बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी व साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आदर्श विद्यालयाचे मुख्याध्यापक आर. यु. पाटील होते. त्यांचेसोबत विचार मंचावर युवा कल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा अशोक पवार, यमुनाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा पत्रकार संजय सूर्यवंशी, मराठा सेवा संघाचे उपाध्यक्ष बापूराव ठाकरे, शिक्षक बी. आर. पाटील उपस्थित होते. सुरुवातीला लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले.

श्री संजय सूर्यवंशी पुढे म्हणाले की, सन १९४२ ते १९६५ अण्णाभाऊंचा सुवर्णकाळ. कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी, वारसा, सुविधा नसताना त्यांनी स्वनिर्मित साहित्य लेखन केले. निरक्षर अण्णाभाऊ अनुभवाच्या बळावर साक्षर झाले. शोषितांच्या व नजरेच्या आड असणाऱ्यांच्या व्यथा मांडत अण्णाभाऊ साठे यांनी वास्तव साहित्य लेखन करुन सर्वसामान्यांना जगण्याचं बळ दिले. त्यांचे लेखन साहित्य, चित्रपट व योगदानाबद्दल माहिती दिली.

प्रा अशोक पवार यांनी विद्यार्थ्यांना हसत खेळत अण्णाभाऊ साठे समजावून सांगितले. वाचनाची सवय लाऊन घ्या व वक्ता बना. आई वडील गुरु यांना विसरु नका असा सल्ला दिला. श्री बापूराव ठाकरे यांनी युवा कल्याण प्रतिष्ठान राबवित असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ए. जी. बैसाने यांनी केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी शाळेचे शिक्षक बी. आर. पाटील, डी. ए. पाटील, एम. व्ही. सूर्यवंशी, आर. जी. देवरे, व्ही. एच. सोनवणे, ए. सी. सोनवणे, आर. व्ही. पाटील, सौ. एस. पी. साठे, आर. एस. बोरसे, संजय पवार, गोस्वामी भाऊसाहेब आदींनी परिश्रम घेतले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!