पुरोगामी व प्रागतिक चळवळीतील कार्यकर्त्यांचे वतीने कवी ना. धों. महानोर व ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत प्रा. हरी नरके यांना श्रद्धांजली

अमळनेर : पुरोगामी विचारांच्या सर्वांसाठीच हा आठवडा वेदनादायी आहे. महानोर, नरके, सोनाळकर यांचे सारखी मोठी माणसे गेल्याचे अतिव दुःख आहे. चळवळीतले मार्गदर्शक हरपल्याचे मत लोकसंघर्ष मोर्चा च्या राष्ट्रीय अध्यक्षा प्रतिभा शिंदे यांनी व्यक्त केले. अमळनेर येथील राजमुद्रा फाऊंडेशन च्या फोर्टस् कार्यालयात निसर्ग कवी ना. धों. महानोर व ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत प्रा. हरी नरके यांना सर्व पुरोगामी व प्रागतिक चळवळीतील कार्यकर्त्यांचे वतीने नुकतीच दिनांक ९ ऑगस्ट रोजी श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियान चळवळीचे मार्गदर्शक प्रा. अशोक पवार, निवृत्त पोलीस निरीक्षक हिरामण कंखरे, संभाजी ब्रिगेडचे श्याम पाटील, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष रामेश्वर भदाणे, ग्रंथावलीकार शिवाजी पाटील, पं. स. चे माजी सदस्य अरुण देशमुख, सामाजिक कार्यकर्त्या भारती गाला, सानेगुरुजी कर्मभूमी स्मारक समितीच्या कार्यवाह दर्शना पवार, माजी गटशिक्षणाधिकारी अशोक बिऱ्हाडे, सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे, प्रा. डॉ. लिलाधर पाटील, पुरोगामी परिवर्तनवादी चळवळीचे कार्यकर्ते आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दयाराम पाटील यांनी केले.

प्रास्ताविक करताना प्रा. अशोक पवार यांनी शेतकरी, कष्टकरींच्या व्यथा कवितेतून मांडणारे ना. धों. महानोर व फुले -शाहू -आंबेडकरांचे विचार जपणारे प्रा. हरी नरके यांच्या निधनाने पुरोगामी विचारांची अपरिमित हानी झाली असल्याचे सांगितले. मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष रामेश्वर भदाणे म्हणाले की, कवी महानोर नुसते निसर्ग कवी नव्हते तर ते एक शेतकरी देखील होते. दोनवेळा आमदार असताना त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न पोटतिडकीने मांडले. तिसऱ्या वेळी चालून आलेली आमदारकी स्वतः नाकारणारे ते एकमेव आमदार होते. निवृत्त पोलीस निरीक्षक हिरामण कंखरे यांनी महानोर दादांसोबत झालेली ओळख कशी कौटुंबिक बनली या आठवणी सांगितल्या. काही कवितांच्या ओळी गायिल्या. मराठी भाषा जिवंत राहावी यासाठी दादांनी चित्रपटात गाणी लिहली असल्याचे सांगितले.

माजी गटशिक्षणाधिकारी अशोक बिऱ्हाडे म्हणाले की, ना. धों. महानोर व प्रा. हरी नरके यांचं जाणं म्हणजे पुरोगामी चळवळीची हानी झाली आहे. अमळनेर टाऊन हॉल येथे प्रा. हरी नरके आले असता, संविधानावर खूप वेळ बोलल्याची आठवण करुन दिली. बामसेफचे वामन मेश्राम यांच्या सांगण्यावरून ते लंडनला गेले व तेथून खरे दस्ताऐवज गोळा केले. मात्र, तरीही चूकीचा इतिहास सांगितला जातो. सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे म्हणाले की, येऊ घातलेल्या विद्रोही साहित्य संमेलनासाठी ना. धों. महानोर व प्रा. हरी नरके दोन्ही साहित्यिकांचा लाभ झाला असता. त्यांचे विचारांवर पुढे जाणं हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. प्रा. डॉ. लिलाधर पाटील यांनी दादांचं मोठेपणा सांगताना आ. हं. साळुंखे अमृत महोत्सवास सर्वात आधी रांगेत उपस्थित असल्याची आठवण केली. हरी नरके सर एक संशोधकच होते. एखादा मुद्दा ठाम मांडण्याची कुवत त्यांच्यामध्ये होती. प्रामाणिक सत्यशोधनाचे काम त्यांनी केले. सानेगुरुजी कर्मभूमी स्मारक समितीच्या कार्यवाह दर्शना पवार यांनी दिवंगत विचारवंतांचे लिखाणाचे सामुहिक वाचन कसे करता येईल ? याचा विचार करावा अशी अपेक्षा व्यक्त करत आदरांजली वाहिली. समारोपाच्या भाषणात श्याम पाटील म्हणाले की, खरं तर कवी ना. धों. महानोर यांच्या शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र अचानक प्रा. हरी नरके यांच्या निधनाची धक्कादायक बातमी आल्याने ऐनवेळी प्रा. हरी नरके यांच्या फोटोची प्रिंट काढून आदरांजली वाहावी लागली. संक्रमणाच्या काळात पुरोगामी विचारवंतांच्या होणाऱ्या एक्झिट बाबत चिंता व्यक्त केली.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!