शेतकऱ्यांची युरिया खतासाठी भटकंती; काळाबाजार होत असल्याची चर्चा

वाढीला आलेली पिके वाया गेल्यास जबाबदार कोण ?

अमळनेर : तालुक्यातील कृषी सेवा केंद्रांत युरिया उपलब्ध नसल्याने ऐन वाढीला आलेले पिक वाया जाते की काय ? अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. तालुक्यात गेल्या दोन आठवड्यांपासून युरिया खताची मोठ्या प्रमाणात टंचाई जाणवत आहे. शेतकऱ्यांची युरिया खतासाठी भटकंती सुरु आहे. परिसरात कोठेही युरिया खत मिळत नाही. खरीप हंगामाच्या पूर्व तयारीला शेतीसाठी लागणारे बि बियाणे, खतांचा तुटवडा भासू दिला जाणार नाही असे कृषी विभाग व लोकप्रतिनिधींकडून सांगितले जाते. प्रत्यक्षात दिलेले आश्वासन पूर्ण होत नसल्याचे चित्र आहे.

खरीप हंगामातील पिकांच्या वाढीसाठी युरिया खताची आवश्यकता आहे. खेड्यापाड्यातून अनेक शेतकरी तालुक्याच्या ठिकाणी खर्च करून येतात. मात्र, युरिया उपलब्ध होत नसल्याने पुन्हा माघारी जावे लागते. कृषी दुकानदाराकडे खते मागितल्यावर युरिया शिल्लक नसल्याचे सांगितले जाते. काही दुकानदार इतर रासायनिक खते घेतल्याशिवाय युरिया मिळणार नसल्याचे सांगतात. यामुळे कृषी अधिकारी व दुकानदार यांच्यात काळाबाजार होत असल्याचे बोलले जात आहे. पिकांच्या वाढीच्या वेळी युरिया उपलब्ध होत नसेल तर संबंधित कृषी विभागाने यात लक्ष देऊन शेतकऱ्यांची होणारी कोंडी टाळायला हवी.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!