अंत्ययात्रा उद्या दुपारी २ वाजता दहिवद येथील घरुन निघणार

अमळनेर : तालुक्यातील दहिवद गावचे मूळ रहिवासी तथा माजी आमदार गुलाबराव वामनराव पाटील यांचे आज रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यू समयी ते ९० वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून वयोमानानुसार प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांचेवर उपचार सुरु होते. त्यांचे पश्चात २ मुले, २ मुली, सूना, नातवंडे असा परिवार आहे. ते गुणवंत पाटील यांचे वडील तर अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष हेमकांत पाटील यांचे आजोबा होत. त्यांचा पार्थिव देह उद्या दिनांक २३ ऑगस्ट रोजी सकाळी ७ ते ८ वाजेपर्यंत साने गुरुजी विद्यालय, अमळनेर येथील पटांगणात दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. याठिकाणी शोकाकुल बांधवांना दर्शन घेता येईल. साने गुरुजी विद्यालयातून बापूंचा पार्थिव देह सकाळी ८ वाजता दहिवद या मूळ गावी नेण्यात येणार असून त्यांची अंत्ययात्रा दुपारी २ वाजता दहिवद येथील घरुन निघणार आहे.
अमळनेर तालुक्याची मुलुख मैदान तोफ, साथी, बापू म्हणून माजी आमदार गुलाबराव पाटील परिचित होते. तीन वेळा ते जनता दलाचे आमदार राहिले असून तालुकाच नव्हे तर महाराष्ट्रात त्यांनी आंदोलने करुन आपला ठसा उमटविला. शिंगाडे मोर्चा काढून शेतकऱ्यांचे प्रश्न उचलून धरले. त्यांनी जून १९९१ मध्ये अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित साने गुरुजी नूतन व कन्या हायस्कूल ची स्थापना केली. आज या संस्थेचा वटवृक्ष झालेला आहे. शिक्षणक्षेत्र व राजकीय योगदान अमळनेेर तालुक्यातील जनतेला कायम स्मरणात राहील. दिव्यचक्र परिवारातर्फे कै.बापूंना भावपूर्ण श्रद्धांजली !