युवा कल्याण प्रतिष्ठान तर्फे कवयित्री बहिणाबाई चौधरी जयंतीचे आयोजन

अमळनेर : कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेतून जीवनसंदेश मिळतो. बुध्दीचा व सृजनशीलतेचा बहर गळून पडला मात्र याकडे फारसे कोणाचे लक्ष नाही ही शोकांतिका आहे असे विचार धनदाई महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. लिलाधर पाटील यांनी व्यक्त केले. युवा कल्याण प्रतिष्ठान आयोजित बहिणाबाई जयंतीनिमित्त धनदाई महाविद्यालयाच्या यशवंत सभागृहात काल झालेल्या कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. सूर नसतील तर गीत, काव्य कोणी ऐकत नाही असे सांगत त्यांनी थेट आपल्या वक्तृत्वातून कवयित्री बहिणाबाई समजावून सांगितल्या. सोबत विचार मंचावर खा. शि. मंडळाच्या विश्वस्त सौ. वसुंधरा लांडगे, युवा कल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. अशोक पवार, प्रा. माणिक बागले उपस्थित होते. मान्यवरांच्या शुभहस्ते कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाची प्रस्तावना डी. ए. पाटील यांनी केली.

प्रा. डॉ. लिलाधर पाटील पुढे म्हणाले की, आधुनिक मराठी कवितेच्या प्रांतातील बहुतेक कवी विद्वान, व्यासंगी होते पण बहिणाबाई चौधरी या अशिक्षित होत्या. आपल्या कवितेतून त्यांनी जीवनाचे तत्त्वज्ञान सांगितले आहे. कवयित्री बहिणाबाईंचा स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास होता. दैववादापेक्षा प्रयत्नवाद श्रेष्ठ अशी त्यांची धारणा होती. हे सांगताना ‘ज्याना हातले घट्टे.. त्याले देव भेटे.’, ‘कामकरी सन.. दुःख विसरासाठे दारुनं व्यसन’ अशा ओव्यांद्वारे त्यांनी बहिणाबाई चौधरी यांच्या आपल्या ओठांवर नसलेल्या कविता व त्याचा अर्थ सांगितला. संत तुकाराम आणि संत कबीर यांची परंपरा घरातच असल्याचेही ते म्हणाले. सौ. वसुंधरा लांडगे यांनी आपल्या मधुर वाणीतून ‘बिना कपाशीनं उले त्याले बोंड म्हणू नही…’, ‘लपे कर्माची रेखा…’, ‘ अरे संसार संसार..’ या कवितांचे सादरीकरण करत बहिणाबाईंच्या आठवणींना उजाळा दिला. बहिणाबाईंनी जे सोसलं ते कवितेतून व्यक्त केलं असेही त्या म्हणाल्या. बहिणाबाई चौधरी अशिक्षित असूनही त्यांनी दर्जेदार अहिराणी, मराठी साहित्याची दर्जेदार साहित्य निर्मिती केल्याचे प्रा. माणिक बागले यांनी सांगितले. आपल्याप्रमाणेच दुसऱ्याचं जीवन मौल्यवान असल्याचे बहिणाबाईंचे विचार व त्यांच्या कवितेतील तत्त्वज्ञान जीवनात समजून घ्यायला हवे असे प्रा. अशोक पवार यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले.
यावेळी कार्यक्रमात डी. ए. पाटील यांनी ‘मन वढाय वढाय..’, बापूराव ठाकरे यांनी ‘अरे रडता रडता डोळे भरले भरले..’, सौ. रेखा मराठे यांनी ‘काया वावरमा धव्वी कपाशी उनी..’, सोनवणे सर यांनी ‘नको नको ज्योतीषा..’ व चारोळी, प्रेमराज पवार यांनी ‘लपे कर्माची रेखा..’, अजय भामरे यांनी ‘बहिणाई तू केली इथे सुपीक माती..’ अशा बहिणाबाईंच्या व स्वरचित कवितांचे सादरीकरण केले. कविता सादरीकरण करणाऱ्या सर्वांना आयोजकांतर्फे पुस्तक भेट देण्यात आले. कार्यक्रमास सर्वश्री बन्सीलाल भागवत, शिवश्री मनोहर नाना, अरुण देशमुख, चेतन शहा, अशोक बिऱ्हाडे, रणजित शिंदे, रामेश्वर भदाणे, प्रा. चंद्रकांत जगदाळे, प्रा. राहुल निकम, गौतम मोरे, पत्रकार संजय सूर्यवंशी, ईश्वर महाजन, निरंजन पेंढारे, सोपान भवरे, अशोक पाटील, उमेश मनोरे, सौ. मनोरे, सौ. रेखा मराठे आदी उपस्थित होते. प्रा. डॉ. माणिक बागले यांनी सूत्रसंचालन केले तर आभार बापूराव ठाकरे यांनी मानले. राष्ट्र सेवा दलाचे माध्यमातून सामाजिक कामात नेहमी अग्रस्थानी असणारे श्री चेतन शहा यांचा वाढदिवस असल्याने कार्यक्रम संपल्यावर केक कापून त्यांचा वाढदिवस ही साजरा करण्यात आला.
